नामपूरला वीस दिवसांआड पाणीपुरवठा

प्रशांत बैरागी
शनिवार, 13 मे 2017

पाणीटंचाईची सर्वांत अधिक झळ आदिवासी भागातील मजूर वर्गाला बसली आहे. शहरातील शेकडो आदिवासी कुटुंबांकडे वैयक्तिक नळ कनेक्‍शन नसल्याने त्यांना सार्वजनिक नळाचा आधार घ्यावा लागतो

नामपूर - शहर व परिसरात तापमानाचा पारा वाढल्याने भूजल पातळीत कमालीची घट होऊन विहिरींनी तळ गाठला आहे. मोसम नदीकाठावरील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्याने शहराला वीस दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर खासगी टॅंकरद्वारा पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. गेल्या महिन्यात हरणबारी धरणातून टॅंकरद्वारा पाणी आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या लाल फितीत अडकल्याने पाणीटंचाईची धग वाढली आहे. ग्रामपंचयात प्रशासनाने टॅंकरच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नामपूर शहराची लोकसंख्या सुमारे पस्तीस हजार आहे. आजही शहराला सुमारे 45 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जुन्याच पाणीपुरवठा योजनेचा आधार घ्यावा लागत आहे. नामपूरचा पाणीप्रश्‍न कायमचा निकाली काढण्यासाठी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक सावंत, भाजप नेते अण्णासाहेब सावंत यांच्या पुढाकारातून 2007 मध्ये सुमारे एक कोटी रुपये मूल्याची जलस्वराज्य प्रकल्प योजना शहराला मंजूर झाली; परंतु संबंधित ठेकेदाराच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे या योजनेचा फारसा उपयोग नागरिकांना झाला नाही. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सहा विहिरी असून, सर्व विहिरींचे पाणी एकत्र करून जॅकवेल यंत्रणेच्या सहाय्याने शहरात पाण्याचे वाटप केले जाते; परंतु दोन महिन्यांपासून विहिरींनी तळ गाठल्याने पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत.

पाण्यासाठी होतो रात्रीचा दिवस
पाणीटंचाईची सर्वांत अधिक झळ आदिवासी भागातील मजूर वर्गाला बसली आहे. शहरातील शेकडो आदिवासी कुटुंबांकडे वैयक्तिक नळ कनेक्‍शन नसल्याने त्यांना सार्वजनिक नळाचा आधार घ्यावा लागतो. दिवसभर शेतात राबल्यानंतर मजूर महिलांना पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. आदर्श चौकातील पाण्याच्या टाकीजवळ अनेक गोरगरीब महिला रात्रभर सार्वजनिक नळासमोर नंबर लावून पाण्याची लढाई लढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पाणी विक्री व्यवसाय तेजीत
पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जारच्या माध्यमातून होणारा पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. यातून शहरात लाखो रुपयांची उलाढाल होते. परिसरातील अनेक शेतकरी दोनशे रुपये प्रती टॅंकर याप्रमाणे विहिरीतील पाणी विकून गरज भागवत आहेत. सध्या लग्नसमारंभांचा हंगाम असल्याने वधूपित्यांना महिनाभर आधी जारचे पाणी आरक्षित करावे लागत आहे. लग्नसराईमुळे नागरिकांना दररोज जारचे पाणी मिळणे मुश्‍कील झाले आहे. घरगुती वापरासाठी टॅंकरद्वारा पाणी विकत घेऊन नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. 200 लिटरच्या टाकीसाठी 40 ते 50 रुपये मोजावे लागत आहेत. शेती व्यवसायालाही पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असून, टॅंकरच्या माध्यमातून पाणी विकत घेऊन पिके वाचविण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे. शहराचा पाणीप्रश्‍न कायमचा निकाली काढण्यासाठी पूरक पाणीपुरवठा योजनेची निर्मिती काळाची गरज आहे. गेल्या महिन्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हरणबारी धरणातून दहा टॅंकरच्या मागणीचा प्रस्ताव तालुका प्रशासनाकडे पाठविल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय वाघ यांनी सांगितले.

Web Title: nampur gets water after 20 days