नामपूरला होतोय दहा दिवसांआड पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

पावसाळ्यातही टंचाई निवारणार्थ टॅंकरची मागणी

नामपूर - शहर व परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने भूजल पातळीत घट होऊन विहिरींनी तळ गाठला आहे. मोसम नदीकाठावरील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्याने शहराला तब्बल दहा ते अकरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाही दिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली आहे. पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर खासगी टॅंकरद्वारा नागरिक आपली तहान भागवत आहेत. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईची धग वाढली आहे. 

मोसम खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शहराचा झपाट्याने विकास होत असून, सुखसोयींच्या उपलब्धतेमुळे परिसरातील नळकेस, सारदे, मालेगाव, साक्री रस्त्यालगत अनेक नववसाहती उदयास आल्या आहेत. शहराची लोकसंख्या सुमारे पस्तीस हजार इतकी आहे. आजही शहराला सुमारे ४५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जुन्याच पाणीपुरवठा योजनेचा आधार घ्यावा लागत आहे. नामपूरचा पाणीप्रश्‍न निकाली काढण्यासाठी २००७ मध्ये सुमारे एक कोटी रुपये मूल्याची जलस्वराज्य प्रकल्प योजना शहराला मंजूर झाली. मात्र, या योजनेचा फारसा उपयोग नागरिकांना झाला नाही. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सहा विहिरी असून, त्यांचे पाणी एकत्र करून जॅकवेल यंत्रणेच्या सहाय्याने शहरात पाण्याचे वाटप केले जाते; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. आदर्श चौकातील पाण्याच्या टाकीजवळील सार्वजनिक नळासमोर रांगेत उभे राहून महिलावर्गाला तासन्‌तास थांबावे लागत आहे. शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी संतोषीमाता मंदिराचा आधार घेत आहेत. 

गेली अनेक वर्षे आम्ही पाणीटंचाईचे चटके सोसले आहेत. त्यामुळे यंदा सुमारे एक लाख रुपये खर्चून कूपनलिका कार्यान्वित केली. सामाजिक बांधिलकीपोटी योगायोग चौकातील कुटुंबीयांना गरजेनुसार मोफत पाणी उपलब्ध करून दिले आहे. 
- मालती पगार, सामाजिक कार्यकर्त्या

पाणीविक्री व्यवसाय तेजीत... 
पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जारच्या माध्यमातून होणाऱ्या पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत असून, यातून शहरात लाखो रुपयांची उलाढाल होते. घरगुती वापरासाठी टॅंकरद्वारा पाणी विकत घेऊन नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. शेती व्यवसायालाही पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असून, टॅंकरच्या माध्यमातून पाणी विकत घेऊन पिके वाचविण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे. उन्हाळ्यात ग्रामपंचायतीच्या वतीने शहरातील काही भागांत टॅंकरद्वारा पाणीपुरवठा सुरू होता. मे महिन्यात हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यानंतर टॅंकर बंद करण्यात आले. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Web Title: nampur nashin news wwater supply after 10 days