तिहेरी हत्याकांडाने नांदगाव तालुका हादरला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

हिंगणेदेहरे येथे मनोरुग्ण तरुणाकडून आजोबांसह तिघांचा कुऱ्हाडीने निर्घृण खून

नांदगाव/न्यायडोंगरी - हिंगणेदेहरे (ता. नांदगाव) येथे आज सकाळी साडेआठच्या सुमाराला रवींद्र पोपट बागूल (वय २८) या मनोरुग्ण तरुणाने आपल्या चुलत आजोबांसह तिघांचा कुऱ्हाडीचे वार करून निर्घृण खून केल्याने गावात एकच खळबळ उडाली. पिंप्रीच्या लमाण तांड्यावरील काही लोकांनी रवींद्रला चहूबाजूने घेरून यथेच्छ चोप दिल्याने आणखी एकाचा जीव बचावला. दरम्यान, पोलिसांनी रवींद्रला ताब्यात घेतले असून, हत्याकांडामागील कारणाचा शोध घेतला जात आहे. 

याबाबतची माहिती अशी, की मूळचा हिंगणे गावचा रहिवासी असलेला रवींद्र पोपट बागूल काही वर्षांपासून भिवंडी येथील वडपा येथे कामानिमित्त राहत होता. तेथील मेरिगो कंपनीत तो दरमहा १३ हजार रुपये वेतनावर आयशर वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. काही दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. दोन दिवसांपूर्वी त्याला सापुताऱ्याजवळील चिखली येथे एका मांत्रिकाकडे उपचाराकडे नेले होते. उपचारानंतर परत येताना त्याने आपल्या भावाचा गाडीतच गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. चिखली येथून ते रात्री अडीचच्या सुमारास गावात पोचले. रात्री प्रवीण व रवींद्र हे दोघे भाऊ आपले काका भालेराव बागूल यांच्या घरीच झोपले. 

आज सकाळी सहाला ‘धोम धोम’ अशा गर्जना करीत रवींद्र स्वतःच्या घरी आला व पुन्हा तिरमिरीतच घराबाहेर पडला. चुलत आजोबा केशव बागूल यांच्या घरी आल्यावर आजोबा त्याला समजुतीच्या गोष्टी सांगत असतानाच रवींद्रने अचानक त्यांना खाली पाडले व बेभान होऊन आजोबांवर कुऱ्हाडीचे सपासप वार केले. यात बागूल जागीच मरण पावले तरी रवींद्र त्यांच्यावर वार करीतच राहिला. हे दृश्‍य पाहून गल्लीतल्या भेदरलेल्या लोकांनी आपल्या घरांचे दरवाजे बंद केले. एवढ्यावर न थांबता रवींद्र रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन पुन्हा रस्त्यावर आला आणि तेथून जाणारे सुभाष भीमाजी बच्छाव (वय ५५) यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढवला. कुऱ्हाडीचा घाव डोक्‍यावर वर्मी बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच रस्त्याने पुढे जाताना रवींद्रने आणखी दोघांवर हल्ला केला. पण सुदैवाने किरकोळ जखमावर त्यांचे निभावले व ते तिथून पळाले. त्यानंतर पाच मिनिटांनी शेतावर जात असलेले विक्रम मंगू पवार (वय ६०) यांच्यावरही रवींद्रने कुऱ्हाडीचे वार केले. त्यात तेही जागेवर गतप्राण झाले.  

विक्रम पवार यांचा खून झाला तिथे जवळच तांडा आहे. हा प्रकार पाहून तांड्यावरचे लोक घटनास्थळी धावले आणि त्यांनी रवींद्रला चोप दिला. तीन खुनांमुळे हिंगणेदेहरे गावात भीतीचे वातावरण पसरले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपअधीक्षक राहुल खाडे, पोलिस निरीक्षक बशीर शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, उपनिरीक्षक बालाजी पद्‌मने, विक्रम बस्ते, दिनेश शूळ, रवी चौधरी, पंकज देवकाते व एकनाथ भोईर घटनेचा तपास करत आहेत.

कंडारीचा जावई
रवींद्र बागूल याचा विवाह भुसावळजवळील कंडारी (जि. जळगाव) येथील विद्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. वडपा येथे त्याचा भाऊ प्रवीण बागूल व पत्नी, असे तिघे जण राहत होते. त्याची पत्नी गर्भवती आहे.

Web Title: nandgaon news tripple murder