डिझेल पंप व गॅस वाटपात 13 कोटीचा अपहार 

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 23 January 2020

डिझेल इंजिन वाटप व घरगुती गॅस युनिट वाटपात 12 कोटी 94 लाख 244 रुपयाचा 
अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकासह ठेकेदार व वीज तंत्री अशा चार जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

नंदुरबार : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या नंदुरबार प्रादेशिक कार्यालयातर्फे लाभार्थ्यांना डिझेल इंजिन वाटप व घरगुती गॅस युनिट वाटपात 12 कोटी 94 लाख 244 रुपयाचा 
अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकासह ठेकेदार व वीज तंत्री अशा चार जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे अल्पभूधारक शेतकरी व दारिद्रयरेषेखालील कुटुंबियांचा आर्थिक 
स्तर उंचावण्यासाठी विविध लाभाच्या योजना राबविण्यात येतात. त्या अंतर्गत शासनाने नंदुरबार जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपली शेती बागायती करता यावी, त्यातून बारमाही पिके घेवून आर्थिक व सामाजिक विकास साधता यावा म्हणून शंभर टक्के अनुदान तत्वावर डिझेल इंजिन (तेलपंप) पुरविण्यात येतात. तसेच महिलांना स्वयंपाकासाठी त्रास होवू नये, त्यांना डोळ्यांचे आजार अथवा धुरीपासून आजारांचे 
बळी पडू नयेत त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण होवून वृक्षतोडही होवू नये त्यामुळे शासनाने आदिवासी विकास विभागामार्फत गॅस युनिट देवून धूरमुक्त घर करण्याची अभिनव योजना राबवली होती या योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी कुटुंबांना त्यांचा लाभ देवून त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी 
शासन प्रयत्नशील होते. त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून स्वयंसेवी संस्थांमार्फत या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उदात्त हेतू शासनाचा होता. 

सहकारी संस्थेला ठेका 
2004 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे नंदुरबार प्रादेशिक कार्यालयामार्फत 
जिल्ह्यात डिझेल इंजीन व गॅस युनिट वाटपाकरीता कंत्राट देण्यात आला होता. त्या योजनेच्या ठेका आकाशदीप विद्युत कामगार सहकारी संस्था नंदुरबार या संस्थेला देण्यात आला होता. या संस्थेमार्फत जिल्ह्यातील लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवून त्याची योग्य ती अंमलबजावणी करण्याचा शासनाचा उद्देश होता. मात्र या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही, असे शासनाच्या लक्षात आल्याने याबाबतची चौकशी सुरु झाली होती. 

आर्वजून पहा :सातपुडातून येते अदृष्य ज्योत...अन्‌ मंदिरात घडतो चमत्कार !
 

13 कोटीचा अपहार 
2004 ते 2009 या पाच वर्षाच्या कालावधीत आदिवासी विकास महामंडळाच्या नंदुरबार प्रादेशिक कार्यालयातर्फे ही योजना राबविण्यात आली. मात्र या योजनेत स्वत:च्या फायद्यासाठी डिझेल इंजीन 
वाटपात घोळ करुन लाभार्थ्यांवर अन्याय करीत 12 कोटी 10 लाख 3 हजार 244 रुपयाचा अपहार केला गेला असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. तर घरगुती गॅस युनिट वाटप योजनेत 83 लाख 97 हजार रुपयांचा अपहार झाला आहे. असे एकुण 12 लाख 94 हजार 244 रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

हेपण पहा ः अबब...समोरील दृष्य पाहताच...वाहनधारकांच्या अंगावर आले शहारे !
 

चार जणांविरुद्ध गुन्हा 
या योजनेंतर्गत अंमलबजावणी होत असतांना या कालावधीत नंदुरबार उपप्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक म्हणून संभाजी राघो कोळपे (रा. बोराडी, ता. शिरपूर) हे होते. तर वीजतंत्री म्हणून गोकूळ रतन बागूल हे कार्यरत होते. तसेच या योजनेचा ठेका आकाशदीप विद्युत कामगार सहकारी 
संस्थेला देण्यात आला होता. त्यामुळे या संस्थेचे अध्यक्ष अरुण शिवलाल कोकणी व उपाध्यक्ष गिरीश उदेसिंग परदेशी या चौघांविरुद्ध अपहार केल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nandurebar merathi news 13 crore strike in diesel pump and gas corruption