
Nandurbar News: कोरोनामुक्त गाव स्पर्धेत नानगीपाडा जिल्ह्यात प्रथम
नवापूर : कोविड-१९ चे व्यवस्थापन करून कोरोनामुक्त गाव स्पर्धेत ग्रामपंचायत नानगीपाडा (ता. नवापूर) यांनी नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून त्यांची विभागस्तरावर निवड झाली.
राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या कोविड-१९ व्यवस्थापन केलेली कोरोनामुक्त गाव स्पर्धा झाली. स्पर्धेत प्रथम टप्प्यात ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक तालुक्यातून दहा पंचायतींचे प्रस्ताव मागविण्यात आले.
त्यातून जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेकडून समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्वोच्च गुण प्राप्त असलेल्या नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत नानगीपाडा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यातही प्रथम क्रमांक राखत स्थान निश्चित ठेवले. दुसऱ्या क्रमांकावर शहादा तालुक्यातील प्रकाशा ग्रामपंचायत, तर तिसऱ्या क्रमांकावर तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण या पंचायतींची नावे जाहीर केली.
योजनेत कोरोनाकाळात ग्रामपंचायत नानगीपाडा यांनी गावपातळीवर लसीकरण शिबिरे भरविली. लोकांना स्वच्छता नेमकी कशी असावी याबाबत ग्रामपंचायत कार्यालय तथा घरोघरी जाऊन ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत शिपाई विलास छगन गावित, गावातील प्रमुख नागरिकांनी सहभागी होऊन प्रत्येक घरी जाऊन प्रशिक्षण दिले.
गावात प्रत्येक घरी सॅनिटायझर व डेटॉल साबणवाटप करून गावातील प्रत्येक कान्याकोपऱ्यात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
स्वच्छता व आपले स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत गावात ग्रामसेवक व त्यांच्या सहकाऱ्यांनी रिक्षाद्वारे गावात कोरोनाला कसे दूर पळवावे याबाबत जनजागृती रॅली काढली. गावात संशयित रुग्ण आढळल्यास त्याला खासगी वाहनाची व्यवस्था करून खासगी किंवा सरकारी दवाखान्यात दाखल करण्याची सोय करण्यात आली.
संशयित रुग्णाला व त्याच्या कुटुंबीयांना घरपोच किराणा भाजीपाला पुरविण्याची सोय करण्यात आली. गावात एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षाची सोय सुविधा करण्यात आली. कोविड-१९ व्यवस्थापन करून गावाला कोरोनामुक्त जास्तीत जास्त कसे करता येईल याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.
गठित केलेल्या समितीच्या सर्व सदस्यांनी जिल्हास्तरीय तपासणी करताना गावातील कामाबाबत समाधान व्यक्त करत म्हटले, की हे काम केवळ ग्रामविकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवक चंद्रशेखर सुर्वे यांच्या प्रयत्नाने शक्य झाले.
सामाजिक सलोखा कसा ठेवावा याबाबत जागरूक राहून जनजागृती, सभांद्वारे वेगवेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून यात महत्त्वाचे योगदान ग्रामसेवक चंद्रशेखर सुर्वे, तुकाराम गावित, मगन गावित, किसन गावित, शकुंतला गावित, हीना गावित, सुनील गावित, यशोदा गावित, रिबका गावित व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.