डिजिटल शिक्षणाद्वारे लागतेय अभ्यासाची गोडी

डिजिटल शिक्षणाद्वारे लागतेय अभ्यासाची गोडी

महापालिकेच्या शाळेला इंग्रजी माध्यमासारखी रुबाबदार इमारत, प्रशस्त मैदान, शिक्षकांच्या पुढाकारातून साकारलेले डिजिटल वर्ग, मराठी माध्यमाबरोबरच सेमी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय, दैनंदिन अध्यापनाबरोबरच केली जाणारी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पंचकच्या विद्यार्थ्यांनी मारलेली धडक या वैशिष्ट्यांमुळे पंचकला सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय झाली आहे. पंचक येथील महापालिकेची शाळा खऱ्या अर्थाने तंत्रज्ञाच्या मदतीने शिक्षण देणारे मॉडेल स्कूल ठरले आहे.

महापालिकेत समाविष्ट होण्याअगोदर ग्रामपंचायत असणाऱ्या दसक-पंचकचा झपाट्याने विस्तार झाला. विद्यार्थ्यांना काळानुरूप आधुनिक शिक्षण देण्यासाठी पंचक येथील महापालिकेच्या शाळेचे विभाजन होऊन दसकला महापालिकेची शाळा सुरू करण्यात आली. पंचक येथील स्वामी विवेकानंद विद्यानिकेतन (शाळा क्रमांक १४) व मॉडेल स्कूल (शाळा क्रमांक ३६) या शाळा तत्कालीन लोकप्रतिनिधी व शिक्षकांच्या एकत्रित समन्वयातून हायटेक झाल्या आहेत. या शाळेत आजमितीला ९०० ते ९५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र दसकला महापालिकेच्या शाळेत काही प्रमाणात सोयी-सुविधांची वानवा असल्याने या शाळेत प्रवेश घ्यायला विद्यार्थी धजावत नाहीत. दसकला २२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय दसकला प्रोग्रेसिव्ह सोसायटीची अभिनव शाळा व इतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थिसंख्या चांगली आहे. पंचकला महापालिकेच्या या शाळांबरोबरच मविप्रच्या जनता विद्यालयात आठवी ते दहावीच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. शिवाय (स्व.) गणेश धात्रक शिक्षण संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने या शाळांमध्येही असंख्य विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत.

बंगल्यातील शाळांची संस्कृती
दसक-पंचकला शैक्षणिकदृष्ट्या पोषक वातावरण असल्याने या परिसरात अनेक शिक्षण संस्थांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मांदियाळी आहे. शासनाच्या शाळेबाबत असलेल्या निकषांना तिलांजली देत चक्क बंगल्यांमध्येच शाळा थाटल्या आहेत. यामुळे या परिसरात बंगल्यातील शाळांची जणू संस्कृतीच उदयास आली आहे. 

जनता विद्यालयाला हवी सुसज्ज इमारत 
मविप्रच्या जनता विद्यालयाची स्थापना १९९० च्या दशकात झालेली असून, या शाळेत आठवी ते दहाचे शिक्षण दिले जाते. शाळेची निकालाची उत्कृष्ट परंपरा आहे. शाळा सुरू झाल्यापासून आजतागायत शाळा कौलारू इमारतीतच भरते. या शाळेला इमारतीची आवश्‍यकता आहे.

खेळाडू घडविण्यात गणेश व्यायामशाळेचा सहभाग
दसक-पंचकच्या विद्यार्थ्यांमध्ये उपजतच खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी गणेश एकताचे संस्थापक अध्यक्ष अजित बने यांनी नाममात्र दरात गणेश व्यायामशाळेत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यात व्हॉलीबॉल, मलखांब, कबड्डी, खो-खो या खेळांचे मार्गदर्शन केले जाते. त्याचा फायदा अनेक खेळाडूंना होऊन ते राष्ट्रीय पातळीवर दसक-पंचकचे नाव चमकवत आहेत.

शिक्षकांचे दातृत्व मोठेच
शिक्षकांचे दातृत्व पंचक येथील शाळा क्रमांक १४ चे मुख्याध्यापक कचरू लभडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुटीत वर्गसजावटीचे काम केले. स्वतः ३६ हजार रुपये जमा करून एक एक वर्गखोली ज्ञानरचनावादानुसार डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत कृतीयुक्त अध्ययनासाठी तयार केली आहे. भविष्यात अजून तीन वर्ग डिजिटल करण्याचा मानस असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

गणेश व्यायामशाळेत आज बैठक
दसक-पंचकच्या शैक्षणिक प्रश्‍नांसह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्या (ता. २३) सायंकाळी साडेसहाला गणेश व्यायामशाळेत बैठक होत आहे. या बैठकीत ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्यासह स्थानिक नगरसेवक उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमात नागरिकांनाही सहभागी होता येईल.
 

या आहेत अपेक्षा
पंचकला शाळा क्रमांक १४ ला दोन वर्गखोल्या कमी पडतात.
शाळा क्रमांक १४ चे पत्रे गंजल्याने ते तत्काळ बदलायला हवेत.
महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह पाहिजे.
विद्यार्थिसंख्येनुसार संगणक उपलब्ध करून सुसज्ज संगणक कक्ष.
दसकच्या शाळेला कायमस्वरूपी भक्कम कुंपण. 
दसकला दोन शिक्षक कमी आहेत.
 

दसकला महापालिकेच्या शाळेची दुरवस्था झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष व पालिकेच्या शिक्षण विभागाची उदासीनता यामुळे या शाळेच्या इमारतीची साधी डागडुजीसुद्धा केली गेली नाही. या वर्षी मी निवडून आल्यानंतर स्वतः लक्ष केंद्रित करून या शाळेच्या समस्यांना प्राधान्य देत त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. 
- अनिता सातभाई, नगरसेविका तथा प्रभाग सभापती, नाशिक रोड

जनता विद्यालयाच्या इमारतीसाठी मी नगरसेवक होतो, तेव्हापासून पाठपुरावा सुरू आहे. त्या वेळी महापालिकेत जागेचा ठरावही मांडला होता. मात्र महापालिकेचे प्रशासन तांत्रिक अडचणींचा बागूलबुवा पुढे करत असल्यामुळे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मविप्रच्या शाळेच्या इमारतीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहिजे तेवढा पुढाकार न घेतल्याने समस्या आहे.
- ॲड. सुनील बोराडे, अध्यक्ष, शालेय समिती, जनता विद्यालय, पंचक 

मोबाईल मॅनियामुळे मुले खेळ व मैदानापासून दूर जात आहेत. त्यामुळे मुलांची शारीरिक वाढ पाहिजे त्या गतीने होत नाही. आम्ही गणेश व्यायामशाळेच्या माध्यमातून वर्षभर शालेय विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण देतो.
- अजित बने, संस्थापक अध्यक्ष, गणेश एकता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ

पंचक परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य मजूर वर्गातील कुटुंब वास्तव्यास आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळेत खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात. शाळेत वर्गखोल्या कमी पडत होत्या, यासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत या शाळेचे विस्तारीकरण करण्यात आले. शाळेची नवीन इमारत प्रशस्त आहे. त्यामुळे गरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणाची सोय झाली याचे समाधान वाटते.
- अशोक सातभाई, माजी नगरसेवक

महापालिकेच्या शाळांची एकीकडे दुरवस्था होत असताना पंचकच्या शाळेने तंत्रज्ञानाची कास धरत डिजिटल वर्गखोल्या व ई-लर्निंगची सुविधा निर्माण केल्याने विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी रांगा लावतात. शिक्षकांनी स्वखर्चातून ज्ञानरचनावर आधारित वर्ग सजावट करून कृतीयुक्त अध्यापन व सेमी 
इंग्रजी माध्यमाची सोय उपलब्ध आहे.
- योगेश मुळाणे, स्थानिक रहिवासी

दसक-पंचकला प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. मात्र उच्च शिक्षणासाठी परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना दुसरीकडे जावे लागते. मुलींच्या दृष्टिकोनातून पंचकलाच महाविद्यालयीन शिक्षणाची सोय होणे काळाची गरज आहे. आम्ही तरुण मंडळी त्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- अजय बोराडे, स्थानिक रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com