ट्रॅक्टर, बैलगाडीने महामार्ग बंद करून शेतकऱ्यांचे आंदोलन

highway
highway

निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला. 

या बंदला शंभरटक्के प्रतिसाद मिळाला. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आज (ता. 8) सकाळी दहा वाजता निफाड शहरातील शांतिनगर चौफुलीवर शेतकऱ्यांनी ऐकत्र येत अंदोलन केले. यावेळी चौफुलीवर कांदा ओतुन आपल्या भावनांचा प्रकट करत रास्तारोको करण्यात आले शेतकऱ्यांच्या पोरांनी द्राक्षबागांची कामे बंद ठेवुन आपल्या ट्रॅक्टरसह बैलगाडी महामार्गावर लावुन तासभर महामार्गावर चक्काजाम केला. त्यामुळे नाशिक औरंगाबाद तसेच शिर्डी पिंपळगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लाबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच आज एसटीचा संप असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले.

या शेतकरी अंदोलनास राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आनिल कुंदे, पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कराड, शिवाजी ढेपले, भिमराज काळे, संपत व्यवहारे, राजेंद्र बोरगुडे, जानकीराम धारराव आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर निफाडचे तहसिलदार विनोद भामरे यांना शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतीमालाला हमिभाव मिळालाच पाहिजे, पेट्रोल पंपाचे डिलिव्हरी पाईप पारदर्शक करण्यात यावे, शेतकऱ्यांना डिझेलवर अनुदान मिळावे, केंद्रीय कृषिमंत्री यांच्या बेजबाबदार वक्तव्याबद्दल त्यांच्याकडून राजीनामा मागणे तसेच त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, बिबट्यांचा बंदोबस्त करून वन्य जीव कायद्यात बदल करून मानवी वस्तीत बिबट्या शिरल्यास बिबट्याला मारून टाकण्याची परवानगी देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

या शेतकरी अंदोलनात नगरसेवक देवदत कापसे, कृष्णा नागरे, रमेश जाधव, शरद ढेपले, कैलास कुंदे, मोहन जाधव, साहेबराव कापसे, नवनाथ जाधव धनंजय कुंदे, महेंद्र गोळे, शिवाजी धारराव, बाळासाहेब पेंढारकर, संजय जैतमाल, कैलास धारराव, रमेश सानप, शंकर राजोळे, माणिक गायकवाड, संतोष राऊत, महेंद्र कापसे, भाऊसाहेब बनकर, आरुण जाधव, गोकुळ जाधव, भावसाहेब कापसे, तुळशिराम वाकचौरे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. या शेतकरी अंदोलनाला निफाडकरांनी शहर बंद ठेवत उत्सफूर्तपणे पाठिंबा दिला. यावेळी उपविभागीय पोलीस आधिकारी अतुल झेंडे, पोलिस निरीक्षक रणजित डेरे, अंबादास मोरे, कोल्है,सोनवणे यांच्यासह पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

भाजप सेनेच्या सरकारने शेतकऱ्यांना नेस्तनाबुत करण्याचा सपाटाच चालवला आहे कांद्याचे भाव वाढले की निर्यातमुल्य बाहेर काढायचे आता तर पाकिस्तानातुन हिंदुत्ववादी सरकार साखर अयात करत आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, आम्ही भिकारी नाहीत आमच्या घामाचे दाम मागत आसुन शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळाला तर तुमच्या मदतीचीही गरज नाही शेतकऱ्यांचा अंत पाहु नका ते तुम्हाला धडा शिकवतील.
- आनिल कुंदे, निफाड तालुकाअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com