नाशिकमध्ये भिकाऱ्यांची एजंटगिरी

नरेश हाळणोर
बुधवार, 26 जून 2019

मुंबईत १०० कोटींहून अधिक उलाढाल
भीक मागणे हा आता टोळ्यांचा व्यवसाय झाला आहे. त्याची उलाढाल आता अब्जावधींमध्ये पोचली आहे. पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे आणि रेल्वे स्थानकांवर कमाई अधिक आहे. मुंबईतील कुलाबा, गेट-वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, जुहू चौपाटी आदी पर्यटनस्थळांसह सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी, हाजीअली, माहीम दर्गा आदी धार्मिक स्थळांना लाखो पर्यटक भेटी देतात. येथे भिकाऱ्यांची दिवसाची कमाई हजारोंच्या घरात आहे. चर्चगेट, अंधेरी, दादर, वांद्रे, सीएसएमटी, ठाणे या रेल्वे स्थानकांवरील उलाढालही हजारोंच्या घरात आहे. मुंबई परिसरात दीड लाखाहून अधिक भिकारी आहेत. याशिवाय तृतीयपंथींच्या वेशात अनेक तरुण भीक मागतात. ही वार्षिक उलाढाल १०० कोटींहून अधिक आहे. त्यांच्या जागा आणि काम ठरवणारा स्थानिक दादा असतो. भीक मागून मिळणाऱ्या रकमेतील २५ ते ३५ टक्के हिस्सा या टोळीला दिला जातो.

नाशिक - येथील गंगाघाटावर दिवसभर तळपत्या उन्हात, कडाक्‍याच्या थंडीत अन्‌ ऊन, वारा, पावसात बसलेले काही भिकारी हे दानशूरांनी दिलेल्या पै-पैच्या जिवावर सावकार झालेत. व्यापाऱ्यांना गंगाघाटावरील काही भिकारी हे १२ टक्के व्याजाने पैसे देतात. त्याच वेळी फुलेनगरमधील काही गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींकडून भिकाऱ्यांची एजंटगिरी केली जाते. शहरातील सिग्नल, रस्त्यावर भीक मागणाऱ्यांकडून हे एजंटरूपी गुन्हेगार रोजची हप्तेवसुली करतात. 

मुंबईतील सिग्नलवरील भिकाऱ्यांवर आधारित २००७ मध्ये प्रदर्शित ‘ट्रॅफिक सिग्नल’ हा चित्रपट आठवत असेल. त्यात भिकारी-फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली कशाप्रकारे केली जाते, याचे चित्रण आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या या चित्रपटातील वास्तव मुंबईपुरते नाही, तर नाशिकमध्ये भीक मागणाऱ्यांचेही वास्तव वेगळे नाही. गंगाघाटावरील काही भिकारी लखपती असून, त्यांचा सावकारीचा धंदा तेजीत आहे. काही भिकाऱ्यांकडे स्वत:ची वाहने असून, ती भाड्याने दिली आहेत. काही भिकाऱ्यांची एक नव्हे तर तीन घरे आहेत, रो-हाउस आहेत.

पुनर्वसनाचा पहिला प्रयत्न
तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मे २०१८ मध्ये शहरातील काही सेवाभावी संस्थाच्या मदतीने भिकाऱ्यांच्या पुनर्वसनचा पहिल्यांदा प्रयत्न केला. पोलिसांनी गंगाघाट, शहरातील सिग्नल, रस्त्यालगतचे लहान मुले, महिला, वयोवृद्ध भिकाऱ्यांना पोलिस वाहनातून मुख्यालयात आणले. सुमारे १३५ जणांना नवीन कपडे देत त्यांना सेवाभावी संस्थांकडे सोपवून पुण्यातील पुनर्वसन संस्थेकडे रवाना करण्यात आले. परंतु महिन्यानंतर त्यातील बहुतांश भिकारी हे पुन्हा नाशिकच्या गंगाघाटावर, सिग्नलवर दिसून आले.

नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे २०१५ मध्ये भिकारी मुलांच्या पुनर्वसनासाठी अभियान राबविले. आज त्यातील १५ मुले शाळेत जात असून, त्यांचे पुनर्वसन झाले आहे. भिकाऱ्यांना प्रेरणा मिळू नये म्हणून त्यांना भीक देणे टाळले पाहिजे.
- प्रणिता तपकिरे, शहर समन्वयक, चाइल्ड लाइन नोडल एजन्सी, नाशिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Beggar Agent Rich