प्रत्येक मार्गावर एक किलोमीटरला बसथांबा

विक्रांत मते
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

अठरा ठिकाणी बस टर्मिनल
नव्याने सुरू होणाऱ्या बससेवेसाठी १४६ नवीन मार्ग प्रस्तावित असून, त्यावर नऊ ऑफ रोड, तर आठ ऑन रोड असे एकूण १७ टर्मिनल उभारले जाणार आहेत. यात मखमलाबाद, पेठ रोड, आडगाव, नांदूर गाव-१, बालाजीनगर, भोसला मिलिटरी स्कूल, जेहान सर्कल, गंगापूर रोड, श्रमिकनगर, पिंपळगाव बहुला, एक्‍स-लो, उत्तमनगर, इंदिरानगर, सिटी गार्डन, निमाणी, नाशिक रोड, गंजमाळ येथील टर्मिनलचा समावेश आहे. त्याशिवाय नाशिक रोड, आडगाव व तपोवन येथे तीन डेपो उभारले जाणार आहेत. १४६ मार्गिकांवर सध्या अस्तित्वात असललेल्या ७१ बस थांब्यांसह नवीन ३०२ बस शेल्टर व ३८९ स्टॅंडपोस्ट बसथांबे निर्माण केले जातील.

७६२ थांब्यांची निर्मिती; खासगी वाहनांचा वापर कमी करण्याचे नियोजन
नाशिक - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी एकीकडे देशातील पहिली टायरबेस मेट्रोसेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. तर दुसरीकडे महापालिकेतर्फे शहर वाहतूक चालविली जाणार आहे. या माध्यमातून शहरातील प्रत्येक मार्गावर एक किलोमीटरला बसला थांबा दिला जाणार असून, त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या ७१ बसथांब्यांसह ७६२ बसथांब्यांची निर्मिती केली जाणार आहे. अधिक बसथांब्यांच्या निर्मितीतून खासगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे नियोजन आहे.

मुंबई, पुणे, नागपूरनंतर वेगाने वाढणाऱ्या शहरांत नाशिकचा क्रमांक लागतो. २०४१ पर्यंत शहराची लोकसंख्या पन्नास लाखांपर्यंत पोचेल, असा अंदाज सर्वेक्षणाअंती मांडण्यात आला आहे. वाढत्या शहरात सध्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्था प्रबळ नसल्याने खासगी वाहने वाढत असून, परिणामी वाहतूक समस्या, पार्किंग, प्रदूषणाच्या समस्या वाढल्या आहेत. वाहने चालविणाऱ्यांबरोबरच वाढत्या वाहनांमुळे पादचारी, अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्या उद्‌भवत आहेत.

राज्य परिवहन महामंडळातर्फे शहरात दिली जाणारी अपुरी सुविधा, खालावलेली बसची स्थिती व एसटीचा तोटा यामुळे वाहतुकीच्या समस्यांत दिवसेंदिवस भर पडत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे गरजेचे झाले आहे. त्यातून दिल्लीच्या अर्बन मास ट्रान्झिट कंपनीतर्फे वाहतूक आराखडा तयार करण्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणानुसार शहरात २०१६ पर्यंत सात लाख ३२ हजार वाहनांची नोंद झाल्याचे नमूद केले. त्यात ७४.६ टक्के दुचाकी, तर १२.३ टक्के चारचाकींचा समावेश दर्शविला आहे. वाहतूक आराखड्यानुसार महापालिकेला बससेवा चालविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात दोनशे इलेक्‍ट्रिक, दीडशे सीएनजी तर ५० डिझेल अशा एकूण ४०० बस धावणार असून, त्यासाठी निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बसचे नियोजन करताना शहरात मार्गिका आखल्या जात आहेत. शहराच्या कोपरान्‌ कोपऱ्यात बससेवा चालविण्याचे नियोजन असल्याने प्रत्येक नगरासमोर बस पोचणार आहे. सध्या राज्य परिवहन महामंडळातर्फे ५०८ मार्गांवर २४३ बस चालविल्या जातात. बसमधून रोज १.२३ लाख प्रवाशांची वाहतूक होते. शहरात एसटी महामंडळाचे ७१ बस थांबे आहेत.

वाढती लोकसंख्या व नगरांच्या तुलनेत बदल न झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून नागरिक खासगी वाहतुकीकडे वळले. आता नव्याने नियोजन करताना शहरात तब्बल ७६२ नवीन थांब्यांची निर्मिती केली जाणार असल्याने प्रवाशांना बससेवेकडे आकर्षित केले जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Bus Stop Public Transportation System