नाशिक जिल्ह्याला ६४ लाख वृक्षांची करावी लागणार लागवड

treeplantation.jpg
treeplantation.jpg

येवला : शासन उद्दिष्ट ठरवून देते, पाऊस पडतो आणि वृक्ष लागवडीचे आकडे फुगवण्याची स्पर्धा सुरू होते, असे चित्र शासनाच्या पावसाळी वृक्षलागवड योजनेच्या बाबतीत आहे. मागील व चालू वर्षातील लावलेल्या निम्यावर वृक्षांचा कधीच कणा मोडला आहे. आता तर शासनाने २०१७ मधील ३३ कोटी वृक्षलागवडीची तयारी करत जिल्ह्याला ६५ लाख वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले आहे.

हरित महाराष्ट्रासाठी आणि जमिनीची होणारी धूप थांबवण्यासाठी वृक्ष लागवड मोहीमेत २०१७ मध्ये ४ कोटी,२०१८ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवड झाली. आता २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड होणार आहे. २०१७ मध्ये नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे सर्व विभागांचा उत्तम प्रतिसाद या मोहिमेला मिळाला. त्यातच वरुणराजानेही कृपा केल्याने खड्डे खोदण्यापासून ते वृक्ष लागवडीपर्यंत मोहीम जोरदार झाली. चालू वर्षी तर मोहिमेचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे. कारण शासनस्तरावरून म्हणावा असा पाठपुरावा न झाल्याने ग्रामपंचायत, नगरपालिकेसारख्या यंत्रणेने देखील वृक्ष लागवडीकडे कानाडोळा केला होता. त्यातच पावसानेही दडी मारल्याचे निमित्त झाल्याने एकूण लागवडीपैकी १५ ते २० टक्के झाडे जगल्याचा अंदाज आहे. त्यातही मोहिम कागदावर आखीव-रेखीव असली तरी झालेली लागवड जगविण्याची संगोपनाची जबाबदारी निश्चित नसल्याने लागवड केली की कोणी त्याकडे फिरकत ही नाही यामुळे मागील दोन वर्षांतील जगलेले झाडे अल्प प्रमाणात आहेत.

आता २०१९ मध्ये तर विक्रमी ३३ कोटींचा टप्पा पार करण्यासाठी नाशिककरांना उद्दिष्ट दहा लाखांवरून थेट तब्बल ६५ लाख केले आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या ४५ विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यासाठीचे उद्दिष्टही आकड्यात दिले आहे.

एक ग्रामपंचायतीला ३२०० झाडे
विशेष म्हणजे एकट्या ग्रामपंचायतींवर तब्बल ४४ लाख झाडांचा भार टाकलेला असून प्रत्येक ग्रामपंचायतीला ३ हजार २०० झाडे लावण्याचे टार्गेट शासनाने दिले आहे. त्या खालोखाल कृषी, सार्वजनिक, बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा विभागावर लाख मोलाचा भार पडणार आहे.

"पर्यावरण संवर्धनासाठी शासनाचे हे सकारात्मक पाऊल आहे. विक्रमी वृक्ष लागवड होताना तिचे संगोपनही व्हावे राजापूर परिसरात गेल्या वीस वर्षांपासून वृक्ष लागवड होते पण पाण्याअभावी झाडे नष्ट होतात. अश्या अडचणीवर उपाययोजना देखील व्हाव्यात."
- दिनेश आव्हाड, अध्यक्ष, खरेदी विक्री संघ, येवला

“वृक्ष लागवड दरवर्षी नियोजनानुसार होत असून अनेक वृक्षांचे जतनही झाले आहे.संगोपनाची जबाबदारी सर्वांनी उचलायला हवी.२०१९ मध्ये मोठे उद्दिष्ट असून त्यासाठी वागदर्डी,राजापूर,तारुखेडले येथे वनविभाग रोपांच्या नर्सरीही तयार करत आहेत.''
- संजय भंडारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला

२०१७ मधील साध्य वृक्षलागवड - २ लाख ७७ हजार
२०१८ मध्ये असलेले उद्धीष्ट्य - ९ लाख ५७ हजार
२०१९ साठी दिलेले लक्ष्य - ६४ लाख ९६ हजार

असे आहे जिल्ह्यातील विभागांना उद्दिष्ट
ग्रामपंचायत - ४४ लाख २३ हजार
कृषी - ६ लाख ८४ हजार
नगरविकास - १ लाख ७१ हजार
महापालिका - ८१ हजार
सा. बांधकाम - ३ लाख ९८ हजार
पाणीपुरवठा - १ लाख ५८ हजार
सहकार - ३५ हजार ५५०
औद्योगिक - ५१ हजार ९५०
शालेय शिक्षण - १ लाख १४ हजार
पोलीस - ५४ हजार
ऊर्जा - ८ हजार ९००
जलसंपदा - ३५ हजार ४५०
महिला व बालकल्याण - ३२ हजार ३५०
ग्रामविकास - ६९ हजार ३००
अल्पसंख्याक कल्याण - ८ हजार ७००
पाणीपुरवठा व स्वच्छता - ९ हजार ३००
लेबर - १५ हजार ३५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com