नाशिकच्या बनावट नोटांची "लिंक' पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

नाशिक - नाशिकमध्ये सापडलेल्या एक कोटी 35 लाखांच्या बनावट नोटा "व्हाइट' करून देण्यासाठी पुण्याची "पार्टी' येणार असल्याची बाब पोलिसांच्या चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी आंतरराज्य टोळीची कृत्ये शोधण्यासाठी आता पुण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या प्रकरणातील संशयित राष्ट्रवादी कॉंग्रेसचा छबू नागरे आणि वादग्रस्त ठरलेला पूर्वीचा घंटागाडी ठेकेदार रामराव पाटीलसह नाशिकमधील संशयितांच्या घरांची झडती शनिवारी पोलिसांनी घेतली. त्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर आंतरराज्य टोळीचा व्यवहार होणार असल्याची माहिती पुण्याच्या प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून बनावटगिरी उघडकीस आणली. आडगाव पोलिस ठाण्यात संशयितांची चौकशी सुरू असताना पुण्यातून एका "पार्टी'ला बनावट नोटा देऊन त्यांच्याकडून चलनातील नव्या नोटा स्वीकारण्याच्या तयारीत टोळी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे आता पुण्यातील त्या "पार्टी'चा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

कुटुंबीयांची होणार चौकशी
बनावट नोटाप्रकरणी पोलिसांनी नोटा छपाईची सामग्री ताब्यात घेतली आहे. संशयितांच्या घरांची कसून तपासणी करत असतानाच प्रत्येक वस्तूची तपासणी करण्याचा आदेश पोलिसांना वरिष्ठांकडून मिळाला आहे. या प्रकरणातील इतर संशयितांच्या घरांचीदेखील चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणात ज्यांच्या कुणाचाही संबंध आढळून अशा सर्वांची चौकशी होणार आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्वांना चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहेत.

Web Title: nashik duplicate currency link in pune