"मेक इन नाशिक'साठी शहराचा विकास हेच मोठे भांडवल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

अन्य शहरांना जोडणाऱ्या महामार्गांचा विचार केल्यास मुंबईला जोडणारा रस्ता चांगल्या दर्जाचा झाला आहे. पुण्याला जाणाऱ्या मार्गाचेही काम प्रगतिपथावर असून, नाशिक- पुणे प्रवासही सुखकर झालेला आहे. औद्योगिक विकासासाठी आता विमानसेवेची गरज आहे

नाशिक - राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत झपाट्याने वाढत असलेल्या नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त विविध पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. त्यानंतर केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्टसिटी अंतर्गत नाशिकची निवड झाली. त्यातून, पायाभूत सुविधांचा झालेला विकास हा "मेक इन नाशिक' उपक्रमासाठी फायदेशीर ठरणार आहे. नवीन उद्योग आणण्यासाठी शहराचा विकास हे मोठे भांडवल ठरू शकेल.

दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी संधी असते. या वेळच्या कुंभमेळ्यात रस्ते रुंदीकरणासह रिंगरोडचे जाळे विखुरले गेले. शहराच्या चारही बाजूंनी रस्ते उभारणीसह वीजपुरवठा व अन्य पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. कुंभमेळा झाल्यानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट शहरांच्या यादीत नाशिकचेही नाव समाविष्ट असल्याने भविष्यात आणखी विकासाला वाव उपलब्ध झाला आहे. शहरातील हवामान, उपलब्ध सुविधांचा विचार करता नवीन उद्योग येण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याने "मेक इन नाशिक' उपक्रमाला लाभ होऊ शकणार आहे.

विमानसेवा हवी
अन्य शहरांना जोडणाऱ्या महामार्गांचा विचार केल्यास मुंबईला जोडणारा रस्ता चांगल्या दर्जाचा झाला आहे. पुण्याला जाणाऱ्या मार्गाचेही काम प्रगतिपथावर असून, नाशिक- पुणे प्रवासही सुखकर झालेला आहे. औद्योगिक विकासासाठी आता विमानसेवेची गरज आहे. त्यासाठीच्या सर्वेक्षणातून नाशिककरांनी आपली मते नोंदविली असून, विमान कंपन्यांनी हवाई सेवा सुरू करण्यासाठी अनुकूलता दर्शविली असल्याचे सांगितले जात आहे.

नाशिकमधील उद्योगवाढीसाठी, विशेषत: आयटी उद्योगाच्या वाढीसाठी हवाई सेवेने शहर अन्य ठिकाणांना जोडले जाणे महत्त्वाचे आहे. आयटी कंपन्यांच्या "नीता' संघटनेमार्फत विमान सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांशी चर्चा झालेली आहे. तीन कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. "एअर टॅक्‍सी'साठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.
- पीयूष सोमाणी, व्यवस्थापकीय संचालक, ईएसडीएस.

Web Title: Nashik eyes for more development