टॅंकरची मागणी अडखळलीय लाल फितीच्या कारभारात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

राज्यात पाऊस 82.3 अन्‌ धरणातील साठा 13.68, तर पेरण्या 45 टक्के

राज्यात पाऊस 82.3 अन्‌ धरणातील साठा 13.68, तर पेरण्या 45 टक्के
नाशिक - राज्यात गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात 90 टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत 82.3 टक्के पाऊस झाला असून, पावसाने ओढ दिल्याने धरणातील साठा 13.68 टक्‍क्‍यांवर सीमित राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 19, 2015 मध्ये 25, तर 2014 मध्ये 17 टक्के साठा धरणांमध्ये होता. तसेच गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 51.1 टक्के खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. यंदा आतापर्यंत 45 टक्के पेरण्या झाल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, मुदत संपल्याने टॅंकर बंद करण्यात आले असून, बऱ्याच जिल्ह्यांमधून टॅंकरची मागणी लाल फितीच्या कारभारात अडखळलीय.

ऐन पावसाळ्यात राज्यभरामध्ये पाऊस, धरणांमधील साठा आणि खरिपाच्या पेरण्यांचा "सकाळ'च्या ठिकठिकाणच्या बातमीदारांनी घेतलेल्या आढाव्यातून हे चित्र पुढे आले आहे. राज्यामध्ये गेल्या महिन्याच्या अखेरीस 939 टॅंकर धावत होते. गेल्या वर्षी जुलैच्या सुरवातीला 3 हजार 602 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.

पावसाला सुरवात होताच, यंत्रणेने हळूहळू टॅंकर बंद करण्यास सुरवात केली. टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची मुदत 30 जूनला संपल्याने पाण्याच्या उपलब्धतेचा विचार न करता, बहुतांश भागातील टॅंकर बंद करण्यात आले आहेत. या महिन्याच्या सुरवातीला नाशिकमध्ये 31, धुळ्यात 15, नंदुरबारमध्ये एक, जळगावमध्ये 23, नगरमध्ये 85 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. पुण्यात 39, साताऱ्यात 57, सांगलीमध्ये 159, सोलापूरमध्ये 4, अमरावतीमध्ये 7, वाशीममध्ये 18, बुलढाण्यात 45, यवतमाळमध्ये 13 टॅंकर सुरू होते.

पुण्याच्या पाणीपुरवठ्यात नाही बदल
पुणे - पावसाने ओढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील धरण साठ्यात अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांत मिळून 7.69 टी.एम.सी. (20.42 टक्के) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा चांगला असल्याने पुणे शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात सध्या तरी कोणताही बदल करण्यात आला नाही. भाटघर (20.83 टक्के) आणि वीर (13.81 टक्के) धरणांच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ नसल्याने शेतीसाठीचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. पावसाने ओढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्याही लांबल्या आहेत.

जलयुक्त शिवारच्या कामाकडे हवे लक्ष
सोलापूर - जिल्ह्यात चार टॅंकरद्वारे पाच हजार 848 लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात होता. त्यात चार गावे आणि 15 वाड्या-वस्त्यांचा समावेश होता. सांगोला तालुक्‍यातील कडलास, अकोला, गळवेवाडी, तर माळशिरस तालुक्‍यातील लोणंद याठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जायचा. मागील वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला आहे. उजनी धरणामध्ये उपयुक्त पाण्याची टक्केवारी वजा 19.21 टक्के आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा वजा 10.29 टी.एम.सी. इतका आहे. जलयुक्त शिवारची कामे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाली आहेत.

नगरमध्ये दुबार पेरणीचे संकट
नगर - जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरवातीला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे केली. त्यानंतर मात्र जिल्ह्यात पाऊस मंदावला. अकोले तालुका सोडल्यास इतर ठिकाणी पाऊस नाही. महिन्याभरापासून पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. भंडारदरा धरणात 44, मुळामध्ये 28, निळवंडेमध्ये 14, आढळामध्ये 13, मांडओहळमध्ये 17, घाटशिळमध्ये 12, घोडमध्ये 25, सिनामध्ये 18 टक्‍के पाणीसाठा शिल्लक आहे. 30 जूनला टॅंकरची मुदत संपली. मात्र टंचाई परिस्थिती पाहता टॅंकरला मुदत वाढवून देण्यास सुरवात केली आहे. प्रशासनाने 33 टॅंकरच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.

सहा प्रकल्पांमध्ये ठणठणाट
जळगाव - जिल्ह्यात सरासरी 663.3 मिलिमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत सरासरी 19.6 टक्के पाऊस झालेला आहे. जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा जलसाठा धरणामध्ये आहे. नंतर मात्र तीव्र टंचाईची चिन्हे आहे. जिल्ह्यात 46 गावांमध्ये 26 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. 7 जूनला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र, तीन आठवडे पावसाने ओढ दिल्याने पिके दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर होते. 1 जुलैपासून दोन ते तीन दिवस चांगला पाऊस झाला. नंतर मात्र ओढ दिली. ती अद्यापही कायम आहे. आता जर पावसाने अशीच ओढ दिली तर पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवणार आहे. वाघूर धरणातील पाणीसाठा 6 टक्के आहे. मध्यम प्रकल्पांपैकी बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा, अंजनी, मन्याड या धरणात पाण्याचा ठणठणाट आहे.

वीस मध्यम प्रकल्पांना पाण्याची प्रतीक्षा
औरंगाबाद - मराठवाड्यातील 75 मध्यम प्रकल्पांपैकी 20 मध्यम प्रकल्पांना अजूनही उपयुक्‍त पाणीसाठ्याची प्रतीक्षा आहे. लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह 854 प्रकल्पात केवळ 14 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. जूनच्या सुरवातीलाच पावसाने दडी मारल्याने पाणीसाठा वाढू शकला नाही. उपयुक्‍त पाणीसाठ्याची प्रतीक्षा असलेल्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 16 पैकी 13, बीडमधील 16 पैकी 4, उस्मानाबादमधील 17 पैकी 2, तर नांदेडमधील 9 पैकी 1 मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये जुलैच्या सुरवातीला केवळ 16.60 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच 75 मध्यम प्रकल्पात 19.35, 734 लघू प्रकल्पांमध्ये 12.94, गोदावरी नदीवरील 11 बंधाऱ्यांमध्ये 11.73, तर तेरणा, मांजरा, रेणा आदी नद्यांवरील 23 बंधाऱ्यांमध्ये 34.56 टक्‍के जलसाठा झाला आहे. जायकवाडीमध्ये 17.69, परभणी जिल्ह्यातील येलदरीमध्ये 3.07, हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्‍वर प्रकल्पात 3.71 टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पात 4 अन्‌ उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना-कोळेगाव प्रकल्पात 2.72 उपयुक्‍त पाणीसाठा आहे. सद्यःस्थिती पिण्यासाठी पाणी उपलब्ध असल्याने टॅंकर बंद आहेत. गरज पडल्यास टॅंकर सुरू केले जातील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

विदर्भातील पाणीसाठा
नागपूर विभाग
प्रकल्प संख्या यंदाचा पाणीसाठा (टक्के) गेल्या वर्षीचा पाणीसाठा (टक्के)

313 लहान 9 24
40 मध्यम 12 15
18 मोठे 11 26
नागपूर विभागात धरण आणि तलावांची संख्या मोठी असल्याने सखल भागातील रहिवाश्‍यांना टंचाईला सामोरे जावे लागत नाही; पण डोंगराळ भागातील टंचाईचा प्रश्‍न कायम आहे.

अमरावती विभाग
प्रकल्प संख्या यंदाचा पाणीसाठा (टक्के) गेल्या वर्षीचा पाणीसाठा (टक्के)
417 लहान 17.94 11.37
23 मध्यम 24.73 20.98
9 मोठे 29.70 18.44

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्‍यातील 12 गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. यवतमाळ नजीकच्या सात गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात केला जात होता. पावसाळा सुरू झाल्यामुळे इतर जिल्ह्यांमधील टॅंकर बंद करण्यात आले आहेत.

Web Title: nashik maharashtra news tanker demand in red ribbon work