'बली'प्रतिपदेस निघाली रेड्यांची मिरवणूक

सोमनाथ कोकरे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

गवळी समाजातर्फे वाजत-गाजत मिरवणुकीची जुनी परंपरा

नाशिक : दिवाळीतील पाडवा म्हणजे आपल्या औजारांची, वाहनांची,चरितार्थ चालवणाऱ्या साधनांची पुजा करण्याचा दिवस. या दिवशी हमाल मंडळी आपल्या हातगाड्यांची पुजा करतात. व्यापारी आपल्या वह्यांची पुजा करुन नववर्षाची सुरुवात करतात. काही ठीकाणी तर या दिवशी गाढवांना आंघोळ घालुन त्यांना रंगविले जाते. बहुतेक ठिकाणी पतीराजांचे औक्षण करुन पुजले जाते. नवविवाहीत जावयास या दिवशी सुवर्ण आहेरही दिला जातो. विविध भागात विविध परंपरा असतात.

फोटो फीचर पाहण्यासाठी क्लिक करा

या पैकीच एक परंपरा म्हणजे दिवाळीतील पाडवा किंवा बलीप्रतिपदा या दिवशी गवळी समाजात रेड्यांची (हेल्यांची) मिरवणूक काढण्याची जुनी परंपरा आहे. यमाचे वाहन आणि बल म्हणजे शक्तीचे प्रतिक म्हणुन रेड्यास सजवुन मिरवणुकीत सहभागी केले जाते. सकाळी रेड्यास गरम पाण्याने आंघोळ घातली जाते, त्यावर विविध रंगाने रंगवले जाते, जनजागृतीपर विचारही लिहिले जातात. ढोल-ताशाच्या गजरात संध्याकाळी मिरवणूक काढली जाते.

पंचवटीतील अनेक गवळी कुटूंब या उत्सवात सहभागी होतात. गोठ्या पासुन म्हसोबा मंदिर, पेठ नाका, दिंडोरी रोड, बाजार समिती पुढील म्हसोबा मंदिर, पंचवटी कारंजा या भागातुन ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक काढली जाते, मंदिरापुढे काही रेड्यांना अभिवादन करण्यास लावले जाते. काठ्या घेऊन युवक मोठ्या संख्येने सहभागी होतात. नाचत फटाके फोडत ही मिरवणुक घरी नेली जाते. घरी गेल्यावर सुहासिनी रेड्यांची पुजा देव्हाऱ्या समोर करतात आणि यावेळी घरातील सर्वांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना केली जाते.

पेठ रोडवरील दत्त नगर, नवनाथ नगर, फुलेनगर याभागातील मोठ्या संख्येने रेड्यांना मिरवणुकी सहभागी केले जाते. यावर्षी काशीनाथ कोठुळे, केरुआण्णा कोठुळे, अरुण चौगुले, अनिल कोठुळे, गणेश चौगुले, सुनिल कोठुळे किसन चौगुले, शंकर चौगुले आदीं समाज बांधवांनी रेड्याची मिरवणुक काढली होती.

Web Title: nashik marathi news buffalo procession