भारनियमनातही ग्राहकांसाठी नाभिकाने अशी लढवली शक्कल

रोशन खैरनार
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन सुरू असल्याने पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. रात्री अपरात्री कधीतरी वीजपुरवठा सुरळीत होतो मग पिकांना पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

सटाणा : सटाणा शहर व बागलाण तालुक्यात सुरू असलेल्या अन्यायकारक भारनियमनामुळे उद्योजक, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांचे खूप हाल होत आहे. भारनियमनाव्यतिरिक्त वीज महावितरणकडून इमर्जन्सीच्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने जनतेच्या त्रासात अधिक भर पडत आहे. दिवाळीचा सण अवघ्या आठ दिवसांवर येवून ठेपला असताना ऐन सायंकाळी होणाऱ्या भारनियमनामुळे शहरासह तालुक्यातील प्रमुख गावांमधील बाजारपेठा ठप्प असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत येथील एका सलून व्यावसायिकाने आपल्या डोक्यावर टोर्च बांधून ग्राहकांची दाढी व कटिंग करण्यासाठी आगळीवेगळी शक्कल लढवली आहे.  

कोळशाचा तुटवडा असल्याचे सांगत राज्य शासनातर्फे राज्यात सर्वत्र भारनियमन सुरू आहे. वीजगळती, वीजचोरी व वीजबिल थकबाकीची कारणे दाखवून महावितरण कंपनीतर्फे सध्या सटाणा शहरातील महालक्ष्मी फिडर 'इ' तर अर्बन फिडर 'एफ' गटात विभागण्यात आले आहे. त्यामुळे महालक्ष्मी फिडरवर दिवसभरात आठ ते नऊ तास तर अर्बन फिडरवर साडेसहा ते सात तासांचे अन्यायकारक भारनियमन सुरू आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन सुरू असल्याने पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. रात्री अपरात्री कधीतरी वीजपुरवठा सुरळीत होतो मग पिकांना पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. भारनियमनाच्या वेळा वगळता दोष दुरुस्तीच्या नावाखालीही तासनतास खंडित वीजपुरवठ्याचा सर्वसामान्य जनतेस सामना करावा लागत आहे.

खंडीत वीजपुरवठयामुळे शहर व तालुक्यातील जनता हतबल झाली असून याचा विपरीत परिणाम होत आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही भारनियमनाचा मोठा तडाखा बसला आहे. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, उद्योग व व्यवसाय या सर्व क्षेत्रातील घटकांवर भारनियमनाचा थेट परिणाम होत आहे. पिठाची गिरणी, इस्त्री, प्रिंटींग, ऑफसेट, झेरॉक्‍स, डीटीपी, फोटोग्राफी, संगणक प्रशिक्षण केंद्र, गॅरेज, वेल्डिंग वर्कशॉप, पापड, मसाला कांडप आदी व्यावसायिकांचा तर रोजगारच धोक्‍यात आला आहे. वैद्यकीय व्यावसायिकांना निदनानंतर रुग्णांवर अपेक्षित शस्त्रक्रिया करताना अचानक खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवाळीपूर्वी होणाऱ्या सहामाही परिक्षेच्या अभ्यासातही हे जाचक भारनियमन मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

सटाणा शहरातील एक सर्वसामान्य सलून व्यावसायिक मनोज पगारे यांनी सायंकाळनंतर आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी वेगळीच शक्कल शोधून काढली आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या सेवेसाठी त्यांनी चक्क आपल्या डोक्याला टोर्च बांधून ग्राहकांची दाढी कटिंग करणे सुरू केले आहे. श्री. पगारे यांचा हा प्रयत्न सटाणा शहर व परिसरात एकच चर्चेचा विषय ठरला आहे. हा प्रकार सोशल मिडियावर झळकताच त्याला अनेकांनी लाईक्स दिल्या आहेत. तर काही ग्राहक पगारे यांच्या दुकानात जाऊन टोर्चच्या प्रकाशात दाढी कटिंग करून घेण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत.

 

Web Title: nashik marathi news satana salon got solution load shedding