...तर स्थायी समितीत भाजपचे गणित बिघडणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

नाशिक  - महापालिकेत भाजपला बहुमताने सत्ता मिळाली असली, तरी स्थायी समिती सभापतिपदाचे गणित विरोधकांनी अपक्षांना सोबत घेतल्याने बिघडणार आहे. भाजपला स्थायी समितीच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्यास चिठ्ठी पद्धतीने सभापतिपदाची निवड करावी लागणार आहे. त्यातून विरोधकांकडे सभापतिपद जाण्याची शक्‍यता आहे. 

नाशिक  - महापालिकेत भाजपला बहुमताने सत्ता मिळाली असली, तरी स्थायी समिती सभापतिपदाचे गणित विरोधकांनी अपक्षांना सोबत घेतल्याने बिघडणार आहे. भाजपला स्थायी समितीच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्यास चिठ्ठी पद्धतीने सभापतिपदाची निवड करावी लागणार आहे. त्यातून विरोधकांकडे सभापतिपद जाण्याची शक्‍यता आहे. 

महापौर, उपमहापौरपदावर भाजपचे नगरसेवक स्थानापन्न झाले आहेत. स्थायी समितीत मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे व अपक्षांच्या चालीमुळे गणित बिघडण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेने गटनोंदणी करताना रिपाइंच्या एका नगरसेवकाला बरोबर घेतल्याने त्यांची सदस्यसंख्या 36 झाली आहे. मनसेने यापूर्वीच अपक्ष मुशीर सय्यद यांना सोबत घेऊन गटनोंदणी केल्याने त्यांची सदस्यसंख्या सहा झाली. कॉंग्रेसने आज अपक्ष विमल पाटील, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुमित बग्गा यांना सोबत घेऊन गटनोंदणी केल्याने दोन्ही कॉंग्रेसची सदस्यसंख्या प्रत्येकी सात झाली. त्यामुळे उतरत्या क्रमाने स्थायी समितीवर जाणाऱ्या सदस्यांची संख्या लक्षात घेता भाजपचे संख्याबळ एकने घटून आठपर्यंत आले आहे. सोळा सदस्यांच्या स्थायी समितीवर सत्ता मिळविण्यासाठी नऊ सदस्यांची गरज आहे. शिवसेनेसह सर्व विरोधक एकत्र झाल्यास भाजपचे स्थायी समिती सत्तेचे स्वप्न भंगण्याची शक्‍यता बळावली आहे. 

भाजप गटात खळबळ 
स्थायीत सोळा सदस्य निवडले जातात. 122 सदस्यांच्या संख्येला सोळाने भागल्यास 7.625 सदस्यसंख्या येते. भाजपचे 66, शिवसेनेचे 36, अपक्षांना सोबत घेतल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी सात व मनसेच्या सहा सदस्यसंख्येबरोबर 7.625 सदस्यसंख्येने गुणाकार केल्यास भाजपचे 8.65, शिवसेनेचे 4.72, दोन्ही कॉंग्रेसचे प्रत्येकी 0.91, तर मनसेचे 0.78 असे संख्याबळ तयार होते. स्थायी समितीवर भाजपचे आठ व शिवसेनेच्या चार असे बारा सदस्यांची नियुक्ती सरळ पद्धतीने होईल. उर्वरित चार सदस्यांची नियुक्ती उतरत्या क्रमाने केली जाईल, त्यात सर्वाधिक मोठी संख्या 0.91 असल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य स्थायी समितीवर नियुक्त होईल. त्यानंतर मनसेचे संख्याबळ 0.78 होत असल्याने त्या पक्षाचा एक सदस्य, त्यानंतर उतरत्या क्रमाने भाजपपेक्षा शिवसेनेची सदस्यसंख्या अधिक असल्याने त्या पक्षाचा एक सदस्य स्थायी समितीवर नियुक्त होईल. त्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांची संख्या पाच होणार आहे. स्थायी समिती सभापतिपदासाठी विरोधी गट एकत्र झाल्यास सभागृहात चिठ्ठी पद्धतीने मतदान होऊन सभापतिपद भाजपकडून हिसकावण्याची चाल खेळली आहे. अर्थात विरोधक एकत्र आले तरच शक्‍य आहे. 

Web Title: nashik municipal corporation