उमेदवारीवरून शिवसेनेत 'दंगल' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

शिवसेना एक कुटुंब आहे. कुटुंबात वादविवाद असू शकतात. शिवसेनेचे उमेदवार निवडीसाठी जिल्हाप्रमुख, खासदारांसह पदाधिकाऱ्यांची समिती होती. समितीने उमेदवार निवडले होते. सगळ्यांच्या स्वाक्षरीने उमेदवार निवडले होते. ज्यांच्यापर्यंत एबी फॉर्म पोचू शकलेले नाहीत, त्यांना पक्षाच्या सचिवांकडून पत्र देऊन उमेदवारीचा विषय मिटवला जाईल. 
- अजय बोरस्ते, महानगरप्रमुख

नाशिक : महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारीचा वाद आज महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना धक्काबुक्की, मारहाणीपर्यंत पोचला. निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या उमेदवारांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिल्याच्या कारणावरून प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बंद खोलीत 'दंगल' झाली. माजी महापौर विनायक पांडे यांना प्रभाग 13 मधून स्वतःसाठी व प्रभाग 24 मधून वहिनी कल्पना व मुलगा ऋतुराज याला उमेदवारी हवी होती; पण ऋतुराजला उमेदवारी न दिल्याने हा प्रकार घडला. शिवसेनेतील अंतर्गत धुमश्‍चक्री थोपविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. 

शिवसेनेतील पक्षांतर्गत धक्काबुक्कीबाबत दोन्ही गटांनी कानावर हात ठेवले आहे. गैरसमजुतीत हे नाट्य घडल्याचा दावा केला आहे. मात्र, उद्या (ता. 4) मुंबईत शिवसेना पक्षप्रमुखांसमोर आमनेसामने होण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेतील या गोंधळामुळे 'आदेश' संस्कृती मानणाऱ्या शिवसेनेत आदेश धाब्यावर बसविले गेल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारीच्या एबी फॉर्म वाटपातील या धक्काबुक्‍कीत काहींनी एबी फॉर्म पळवून नेले. 

माजी महापौर विनायक पांडे यांना प्रभाग 13 मधून उमेदवारी हवी होती. ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले होते. दुसरीकडे प्रभाग 24 मधून वहिनी कल्पना पांडे यांचीसुद्धा उमेदवारी निश्‍चित होती. त्याव्यतिरिक्त पांडे यांचा मुलगा ऋतुराज याच्यासाठी प्रभाग 24 मधूनच उमेदवारी हवी होती; पण बंडखोरी होण्याच्या भीतीने शिवसेनेने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचे वाटप सुरू केले. सुरवातीला खासदार हेमंत गोडसे यांच्या जीपीओसमोरील कार्यालयात एबी फॉर्मचे वाटप सुरू होते. तेथे गर्दी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर उपनगर येथील इच्छामणी लॉन्स येथे फॉर्मचे वाटप सुरू झाले. तेथेही हाच प्रकार घडल्याने अखेरीस चांडक सर्कल येथील हॉटेल एसएसके सॉलिटिअर येथे फॉर्मचे वाटप करण्यात आले. 

वादाला सुरवात, धक्काबुक्‍की आणि शिवीगाळ 
विनायक पांडे समर्थकांसह हॉटेलमध्ये दाखल झाले. ऋतुराजला उमेदवारी दिली नसल्याचे समजल्यावर तेथे वादावादी आणि शिवीगाळ केली. उमेदवारीवरून बाचाबाची झाल्याची माहिती बाहेर आल्यानंतर पांडे समर्थकांनी हॉटेलमध्ये घुसून महानगरप्रमुख बोरस्ते यांना जिन्यावरून खाली ओढत आणत धक्काबुक्की केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हॉटेलबाहेर कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. 

शिवसेनेत उमेदवारीसाठी 25 लाखांचा भाव : पांडे 
शिवसेनेत उमेदवारीसाठी 25 लाखांचा भाव फुटल्याचा आरोप विरोधकांनी नव्हे, तर शिवसेनेचेच माजी महापौर विनायक पांडे यांनी केला. रात्री-बेरात्री झोडल्या जाणाऱ्या 'पार्ट्यां'कडे लक्ष वेधत त्यांनी महानगरप्रमुख बोरस्ते आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना वेळीच आवर न घातल्यास शिवसेना उद्‌ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही दिला. महापालिकेच्या पश्‍चिम विभागीय कार्यालयात श्री. पांडे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की आज सकाळपासून मी करंजकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी मला पहिल्यांदा शिर्डी येथे असल्याचे सांगितले. नंतर खरे सांगा, असे दटावल्यावर त्यांनी हॉटेल एसएसके सॉलिटिअरमध्ये असल्याचे सांगितले. मी स्वतः, मुलगा आणि वहिनींसाठी उमेदवारी मागत होतो. मात्र, मुलाला उमेदवारी देऊ शकत नाही, असे करंजकर सांगू लागले. त्यामुळे पत्नीचा पारा चढला. त्यानंतर मारहाणीचे प्रकरण घडले. 

मारहाण प्रकरणी सहा जणांना अटक 
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ पोलिस कुमक घेऊन घटनास्थळी आले. याप्रकरणी पोलिसच फिर्यादी झाले. मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संशयित नागेश आनंद शिंदे (30, रा. मेन रोड, नाशिक), नितीन नामदेव करंजकर (40, रा. करंजकर गल्ली, भगूर), रोशन रमेश शिंदे (28, रा. अनुसयानगर, द्वारका), संदीप अर्जुन पाटील (26, रा. रोकडोबा तालीमजवळ, जुने नाशिक), गुलाम मुस्ताक शेख (21, रा. समतानगर, नाशिक), जयंत अशोक गोवर्धने (37, रा. सुखदेव शाळेजवळ, इंदिरानगर) यांना अटक झाली. त्यांना सायंकाळी उशिरा जामिनावर सोडून देण्यात आले. 

शहरात तणाव; बंदोबस्त वाढवला 
एबी फॉर्मच्या वाटपावरून झालेल्या 'रामायणा'नंतर शिवसेनेत झालेली हाणामारी आणि इतर पक्षांतील धूसफूस लक्षात घेऊन शहरातील काही भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर पोलिस बारकाईने लक्ष ठेवून असून, खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. 

Web Title: Nashik Municipal Corporation election Shiv Sena Matoshri politics