कोकणी कुटुंबीयांना "दुबई' वॉर्ड यंदा साथ देणार?

विक्रांत मते - सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

सिराज, निजामभाई, सुफी व गुलजार निवडणुकीच्या रिंगणात

सिराज, निजामभाई, सुफी व गुलजार निवडणुकीच्या रिंगणात

नाशिक: पालिका, महापालिका निवडणुकीचा निकाल काही लागला, तरी कोकणीपुरा भागातून कोकणी कुटुंबातील सदस्याची एक जागा हमखास निवडून येतेच, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. यंदाही कोकणी कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आतापर्यंतची प्रभागाची राजकीय व भौगोलिक स्थिती कायम कोकणी कुटुंबीयांना अनुकूल राहिली आहे. यंदा मात्र इतर भाग कोकणीपुरा भागाला जोडला गेल्याने त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. यापूर्वी सिराज, निजामभाई, सुफी व गुलजार यांनी कुटुंबाकडून किल्ला लढविला. यंदाही कोकणीपुरातील हक्काचा किल्ला शाबूत ठेवण्यासाठी पुन्हा चौघे रिंगणात उतरण्याच्या प्रयत्नात आहेत.

कोकणी कुटुंबातील अब्दुल रजाक कोकणी यांनी धुळे पालिकेचे नगराध्यक्षपद भूषविल्यानंतर नाशिक पालिकेतही नगरसेवक व शिक्षण मंडळाचे सभापती होते. कॉंग्रेसचे गुलाम मोईनुद्दिन कोकणी कॉंग्रेसच्या तिकिटावर पालिकेत निवडून आल्यानंतर नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. गुलाम महम्मद कोकणी (पहिलवान) हेही कॉंग्रेसकडून निवडणूक जिंकत नगराध्यक्ष राहिले. नाशिक पालिकेत नगरसेवक राहिलेल्या मैनुद्दिन कोकणी महापालिकेत दोनदा निवडून आले होते. 2002 मध्ये कोकणीपुरा भागातून निवडणूक लढवत कॉंग्रेसचे सिराज कोकणी नगरसेवक झाले होते. कोकणी कुटुंबातील निजामभाई कोकणी यांना 2007 मध्ये निवडणूक लढण्याची संधी मिळाली व ते नगरसेवक झाले. 2012 मध्ये कोकणी कुटुंबाच्या पारंपरिक मतदारसंघातून सुफी जीन यांनी पारंपरिक मतदारसंघाची वेस ओलांडून, तर गुलजार कोकणी भाभानगर परिसरातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत निवडून आले. त्यापूर्वी कोकणी कुटुंबातीलच बिलाल खतीब 1992, 2002 व 2007 मध्ये नगरसेवक होते.

"दुबई वॉर्ड' कोणाला तारणार?
माणुसकी व श्रीमंतीमुळे पालिका काळापासून कोकणी कुटुंबीयांना जुन्या नाशिकमधील कोकणीपुरा भागाने कायम साथ दिली आहे. एकट्या कोकणी कुटुंबाचे येथे तीन हजारांहून अधिक मतदान आहे. त्यामुळे कुटुंबातील हक्काचा माणूस येथून निवडून येतोच. कोकणीपुरा भागाला "दुबई वॉर्ड' म्हणूनही संबोधले जाते, ते कोकणी कुटुंबाच्या श्रीमंतीमुळे. नाशिकचे महानगरात रूपांतर होण्यापूर्वी शहरात कोकणी कुटुंबाच्या अधिक जमिनी होत्या. शेती, त्यानंतर शेतीपूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन, दुग्ध व्यवसायावर कोकणी कुटुंबाची पकड कायम राहिली. कोकणी कुटुंबातील व्यक्ती नोकरी करतो, असे उदाहरण तुरळकच. या कुटुंबाकडे पैशांच्या श्रीमंतीबरोबरच मनाची श्रीमंतीही मोठी राहिली आहे. त्या काळात पालिकेची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसायची. कर्मचाऱ्यांचे पगार करणे मुश्‍कील असायचे. त्या काळात कोकणी कुटुंबीय पालिकेचा स्वतः पगार तर घेत नव्हतेच; परंतु पालिकेला अर्थपुरवठाही त्यांच्यामार्फत व्हायचा. माणुसकीचे हे एक उत्तम उदाहरण. पालिका काळापासून ते आतापर्यंत कोकणी कुटुंबातील किमान एका सदस्याने तरी नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. त्यात अद्यापही खंड पडला नाही. यंदा प्रभागरचनेमुळे भौगोलिक स्थिती बदलली आहे व राजकीय वातावरणही बदलल्याने कोकणी कुटुंबासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. कुटुंबातून कोणी निवडणूक लढायची, हे एकत्र बसून ठरविले जाते. यंदा कोकणीपुरा भागातून सिराज, निजामभाई व सुफी जीन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गुलजार कोकणी यांनी पारंपरिक मतदारसंघाची वेस ओलांडून भाभानगर परिसरात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. तेथून ते निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: nashik municipal election