सुटीत मामाकडे आलेल्या विद्यार्थ्याचा जेल रोडला खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नाशिक रोड - दुचाकी व चारचाकी वाहनांतून आलेल्या २० ते २५ युवकांनी गोळीबार करीत एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला. जेल रोड परिसरातील मंगलमूर्तीनगरमध्ये भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

नाशिक रोड - दुचाकी व चारचाकी वाहनांतून आलेल्या २० ते २५ युवकांनी गोळीबार करीत एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला. जेल रोड परिसरातील मंगलमूर्तीनगरमध्ये भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

मंगलमूर्तीनगरमधील हर्ष सोसायटीत राहणारे भाऊसाहेब जाधव यांच्याकडे पंचशीलनगर, कसारा येथे राहणारा भाचा तुषार भास्कर साबळे (वय १५) तीन दिवसांपूर्वी पाहुणा म्हणून आला होता. त्याने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. आज दुपारी चारच्या सुमारास त्याच भागात राहणारी त्याची आत्या विमल गांगुर्डे यांच्याकडे तो बसलेला होता. त्या वेळी त्याचा मामेभाऊ अक्षय भाऊसाहेब जाधव (वय २२) हा दुचाकीवर तेथे आला व तुषारला सोबत घेऊन गेला. त्यानंतर हे दोघे मंगलमूर्तीनगरमध्ये त्यांच्या इमारतीखाली असलेल्या बाकावर अन्य दोन मित्रांसह गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी इमारतीच्या मागील बाजूकडून एक ओम्नी व्हॅन, पांढऱ्या रंगाची अल्टो कार, इंडिगो कारसह दोन दुचाकीवर तोंडाला काळे फडके बांधून आलेल्या २० ते २५ युवकांनी अचानक तेथे गोळीबार केला. सुदैवाने गोळी कोणाला लागली नाही. मात्र, बाकावर बसलेले सगळेच जीव वाचविण्यासाठी तेथून पळून गेले. या वेळी तुषारही पळाला. मात्र, हल्लेखोरांनी त्यास गाठून कोयते, तलवारी व अन्य धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोरांनी सोसायटीतील सर्वच सदनिकांच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या होत्या. त्यानंतर वाहनात बसून कॅनॉल रोड मार्गाने ते उपनगरच्या दिशेने फरारी झाले. या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाला होता. परिसरातील नागरिकांनी उपनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी नातेवाइकांच्या मदतीने तुषारला नाशिक रोड येथील खासगी रुग्णालयात व तेथून बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्‍टरांनी तो मृत झाल्याचे जाहीर केले. तुषारचे नातेवाईक व मित्रांनी या वेळी बिटको रुग्णालयात गर्दी केली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, बाजीराव महाजन आदींसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: nashik murder student jail road