पावसामुळे द्राक्षाला दीड हजार कोटींचा दणका

महेंद्र महाजन
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

खर्च 100 कोटींनी वाढणार; बागांमधील फुलोरा कुजला

खर्च 100 कोटींनी वाढणार; बागांमधील फुलोरा कुजला
नाशिक - द्राक्षांची छाटणी झाल्यापासून ते काढणीपर्यंतच्या बिगमोसमी पावसाने सतावल्यानंतर गेल्या वर्षी निसर्गाने उत्पादकांना मदतीचा हात दिला. पण यंदा पुन्हा झालेल्या पावसामुळे 3 ते 18 सप्टेंबरमध्ये छाटणी झालेल्या बागांमधील फुलोरा कुजला, फुटव्यात घड जिरले. त्यामुळे द्राक्षपंढरीतील शेतकऱ्यांना एक ते दीड हजार कोटींचा दणका बसला आहे. आता दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आणि पावसाच्या शिडकाव्यामुळे खर्चात आणखी 100 कोटींची भर पडणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात उद्या (ता. 22)पासून आठवडाभर पावसाची शक्‍यता नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. उद्या दुपारनंतर हवामान बदलाची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र त्याचवेळी तीन व चार डिसेंबरला पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील द्राक्षांचे क्षेत्र दोन लाख एकरांपर्यंत पोचले. एकरी सरासरी नऊ टन उत्पादन पाहता, यंदा शेतकऱ्यांना 18 ते 20 लाख टन द्राक्ष उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु मध्यंतरी झालेल्या पावसामुळे बागांमधील झाडांची मुळं गच्च झाली. तसेच फुलोरा, घडकूज या समस्येच्या जोडीलाच सूर्योदयापर्यंत पाने ओली राहिल्याने रोगकिडीच्या प्रादुर्भावाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. हे सारे नुकसान 30 टक्‍क्‍यांपर्यंत झाल्याचे शेतकरी सांगतात. नाशिकप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये अशाच पद्धतीने नुकसान झाल्याची माहिती जिल्ह्यातील उत्पादकांपर्यंत पोचली आहे.

एकरी पाच हजारांचा खर्च
जिल्ह्यात फुलोरा, फूट काढणे, 3 ते 15 मिलिमीटर आकाराचे मणी, पाणी उतरणे, काढणी अशा विविध टप्प्यांमध्ये द्राक्ष बागा आहेत. बदलेल्या हवामानामुळे आर्द्रता असलेल्या भागातील बागेत डावणीचा, तर आर्द्रता नसलेल्या भागात बागांवर भुरी आणि रस शोषणाऱ्या किडीच्या प्रादुर्भावाची टांगती तलवार आहे. या रोगकिडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना एकरी 4 ते 5 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.

'नैसर्गिक आपत्ती द्राक्षांच्या बागांना सोडत नाही. अशा परिस्थितीत शाश्‍वत शेतीसाठी प्रतिकूल परिस्थितीतही तग धरू शकतील, अशा "पेटंट' वाणाची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर बागा आच्छादित करण्याच्या योजनेला प्राधान्य मिळण्याची गरज आहे.''
- कैलास भोसले, महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघ

Web Title: nashik news 1500 crore grapes loss by rain