स्मार्टसिटीच्या वीस कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

स्मार्टसिटीच्या वीस कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

संचालकांच्या बैठकीत निर्णय; कालिदास कलामंदिर, फुले कलादालन, नेहरू उद्यानाचे रूप पालटणार

नाशिक - स्मार्टसिटीच्या सुरू असलेल्या प्रवासाला आजपासून गती मिळाली. नाशिक म्युनिसिपल स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीच्या दुसऱ्या बैठकीत आज १९ कोटी ८८ लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर नवीन कार्यालय निर्मिती, नव्या प्रकल्पांचे उद्‌घाटन, नवीन संचालकांची नियुक्ती याबरोबरच सल्लागार कंपनीची नियुक्ती आजच्या बैठकीत करण्यात आली.

स्मार्टसिटी घोषणेला २७ जानेवारीला द्विवर्षपूर्ती होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ होणार आहे. आजच्या बैठकीत अधिकारी नियुक्तीमुळे कामांचे फ्रेमवर्क तयार होऊन प्रत्यक्ष अमंलबजावणीलाच्या दृष्टीने पावले पडणार आहेत. अध्यक्ष डॉ. सीताराम कुंटे यांनी याबाबत बैठक घेतली. महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सिडकोच्या सहसंचालक प्राजक्ता लवंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय पगार, शहर अभियंता यू. बी. पवार व स्मार्टसिटीचे अधिकारी सी. बी. आहेर आदी उपस्थित होते. स्मार्टसिटीतील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र, राज्य शासनाकडून १४५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारकडून ९६ कोटी प्राप्त होणार असल्याचे डॉ. कुंटे यांनी सांगितले. 

पंडित कॉलनीत स्मार्टसिटीचे कार्यालय
आजच्या बैठकीत स्मार्टसिटीचे कार्यालय निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यात जुन्या पंडित कॉलनीतील महापालिकेच्या इमारतीत असलेल्या आरोग्य विभागाच्या कार्यालयात स्मार्टसिटीचे कार्यालय असेल. चार महिन्यांनंतर होणाऱ्या स्मार्टसिटी संचालकांची बैठक त्या कार्यालयातच होईल. आजच्या बैठकीत सभागृहनेते दिनकर पाटील यांची संचालकपदी नियुक्ती झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून महासभेच्या माध्यमातून नावे आल्यानंतर त्यांचा समावेश संचालक मंडळात होईल.

नवीन सेवांचे उद्‌घाटन
स्मार्टसिटी प्रकल्प घोषणेच्या द्विवर्षपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येत्या मंगळवारी (ता. २७) प्रकल्पांचे उद्‌घाटन होण्याची शक्‍यता आहे. त्यात कालिदास कलामंदिर पुनर्निर्माण प्रकल्पाच्या उद्‌घाटनाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त महापालिकेने सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रातर्फे ४५ प्रकारच्या सेवा एक खिडकी योजनेद्वारे दिल्या जात आहेत. त्यात नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.

स्मार्टसिटी अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या स्पेशल पर्पज व्हेईलक कंपनीचे कामकाज चालविण्यासाठी पदे भरणे आवश्‍यक होते. एसपीव्ही कंपनीच्या बैठकीत पदे भरण्यात आल्याने आता प्रकल्पांना गती देता येणे शक्‍य आहे.
- सीताराम कुंटे, अध्यक्ष, एसपीव्ही कंपनी.

या कामांना मिळाली मंजुरी
 महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचे पुनर्निर्माण 
(खर्च नऊ कोटी ५५ लाख)
 महात्मा फुले कलादालनात आर्ट गॅलरी 
(खर्च तीन कोटी ३१ लाख)
 नेहरू उद्यान पुनर्निर्माण (खर्च एक कोटी २५ लाख)
 विद्युत शवदाहिनी (खर्च सहा कोटी सात लाख)
अधिकारी-कर्मचारी वर्गाची नियुक्ती
स्मार्टसिटी कंपनीचे कामकाज चालविण्यासाठी पीएमएस (सल्लागार कंपनी) ची नियुक्ती आज झाली. त्यासाठी यापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. केबीएमजी, क्रिसील, टाटा कन्सल्टन्सीव्यतिरिक्त अन्य दोन कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या. त्यात केबीएमजी कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास आज मान्यता देण्यात आली. स्मार्टसिटीसाठी मुख्य अभियंता व नगर नियोजनकार ही दोन पदे शासनाकडून भरली जाणार आहेत. त्याव्यतिरिक्त मुख्य लेखाधिकारी पदावर बाबूराव निर्मळ, कंपनी सचिव म्हणून महेंद्र शिंदे व माहिती व तंत्रज्ञान अधिकारी पदावर प्रमोद गुर्जर यांची नियुक्ती झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com