पंचवटी, जुने नाशिकमध्ये  २४ तास पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

नाशिक - शहरातील पंचवटी, जुने नाशिक या गावठाण भागासह महात्मानगर, बडदेनगर येथे येत्या काळात २४ तास स्वच्छ व शाश्‍वत पाणीपुरवठा केला जाणार आहे. स्मार्टसिटीअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर सात दिवस २४ तास पाणीपुरवठा होईल. त्यासाठी स्काडा तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. 

नाशिक - शहरातील पंचवटी, जुने नाशिक या गावठाण भागासह महात्मानगर, बडदेनगर येथे येत्या काळात २४ तास स्वच्छ व शाश्‍वत पाणीपुरवठा केला जाणार आहे. स्मार्टसिटीअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर सात दिवस २४ तास पाणीपुरवठा होईल. त्यासाठी स्काडा तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. 

महापालिकेतर्फे नुकतेच वॉटर ऑडिट करण्यात आले. त्यात १५ टक्के सरळ पाणीगळती, तर ५५ पट्टे बेहिशेबी पाण्याचा वापर होत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. शाश्‍वत पाणीपुरवठा करायचा असेल तर पाण्याची गळती रोखण्याबरोबरच महसुलात वाढ होणेदेखील गरजेचे आहे. सध्या महापालिकेत पाणीयोजनांवर होणारा खर्च व प्रत्यक्षात प्राप्त होणारे उत्पन्न याचा विचार करता मोठी तफावत आढळून येते. पाणीपुरवठा योजना किमान ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविण्यासाठी महापालिकेला सहाशे कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

शाश्‍वत पुरवठ्यासाठी पुरवठ्यात सुधारणा करून गळती रोखण्यासाठी जलवाहिनी व व्हॉल्व्ह बदलणे, पाण्याचा पुनर्वापर, पाणीमीटर बसविण्यासाठी स्काडा तंत्रज्ञानाचा वापर करणे, जुन्या वाहिन्या बदलणे व जलकुंभांची निर्मिती योजना राबविल्या जाणार आहेत.

वॉटर ऑडिटमध्ये...
 ग्राहकांपर्यंत ४५ टक्के देयके पोचतात
    ५५ टक्के पाण्याचा हिशेब नाही
    महापालिकेच्या इमारती, मिळकतींत ७ टक्के गळती
    १४.५ टक्के सरळ पाणीगळती
    सरासरी देयके दिल्याने महसुलात तूट

गावठाणात महापालिकेची कसरत
पाणीपुरवठा योजना राबविताना पहिल्या टप्प्यात स्मार्टसिटीअंतर्गत महात्मानगर व बडदेनगरमध्ये दररोज २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचबरोबरच एरिया बेस डेव्हलेपमेंटअंतर्गत पंचवटी व जुने नाशिक भागात २४ तास पाणीपुरवठा केला जाईल. जुने नाशिक भाग चढउताराचा व जुनी घरे अधिक असलेला भाग आहे. येथे पाणीपुरवठा योजना राबविताना मोठी कसरत करावी लागेल. यात यश आले तरच योजना पुढे कायम राहणार आहे.

मानसिकता  बदलण्यासाठी
चोवीस तास पाणीपुरवठा केल्यास घरात पाणी साठवून ठेवण्याची मानसिकता नाहीशी होऊन हवे तेवढेच पाणी वापरण्याकडे अधिक कल असल्याचा निष्कर्ष पाहणीतून निघाला. २४ तास पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी सांगितले.

Web Title: nashik news 24 hours water supply

टॅग्स