बाळांचा कोंडवाडा सुटणार

बाळांचा कोंडवाडा सुटणार

नाशिक - नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) असलेल्या कक्षातील इन्क्‍युबेटरच्या कमतरतेमुळे बालमृत्यू प्रकरण "सकाळ'मधून उजेडात आल्यानंतर गुरुवारअखेर तीन नवीन इन्क्‍युबेटर दाखल झाले आहेत.

सहा इन्क्‍युबेटर दोन दिवसांत येणार असून, उर्वरित सात आठवडाभरात उपलब्ध होणार आहेत. इन्क्‍युबेटरसाठी निश्‍चित करण्यात आलेल्या जागेत तांत्रिक प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून पहिल्या टप्प्यामध्ये नऊ इन्क्‍युबेटर सुरू केले जाणार असून, त्यासाठी लवकरच तंत्रज्ञ येणार आहेत.

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यात 55 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त "सकाळ'मधून 5 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या आरोग्य विभागाने वेगाने पावले टाकत उपाययोजना केल्या. रुग्णालयात 18 इन्क्‍युबेटर असताना ती संख्या अपुरी पडत होती. क्षमतेपेक्षा चारपटीने अर्थात एका इन्क्‍युबेटरमध्ये चार- चार नवजात बालकांवर उपचार केले जात होते. "एसएनसीयू' कक्षातील हे वास्तव उजेडात आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी तत्काळ इन्क्‍युबेटरच्या संख्येत वाढ करण्याचे आश्‍वासन दिले.

त्यानुसार, एसएनसीयू कक्षातील अतिरिक्त जागेत इन्क्‍युबेटर बसविण्याच्या तांत्रिक कामाला प्रारंभ झाला आहे. रुग्णालयात 32 इन्क्‍युबेटर उपलब्ध होणार असल्याने काही प्रमाणात नवजात बालकांच्या उपचाराच्या कोंडवाड्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

"सकाळ'ने केलेल्या पाठपुराव्यामुळे इन्क्‍युबेटरचा प्रश्‍न मार्गी लागतो आहे. तीन इन्क्‍युबेटर रात्रीच आले असून, आणखी सहा दोन दिवसांत येतील. तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर इन्क्‍युबेटर बसविण्यासाठी इंजिनिअर्स येतील. त्यानंतर पडताळणी केल्यानंतर ते कार्यान्वित केले जातील.
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com