नाशिक महापालिका हद्दीतील मद्याची 42 दुकाने सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एप्रिल महिन्यापासून राष्ट्रीय व राज्य महामार्गालगतच्या 500 मीटरच्या आत असलेले मद्यविक्री व बिअरबारची दुकाने बंद करण्यात आली, तर महापालिका हद्दीतून जाणाऱ्या राज्य महामार्गालगतच्या दुकानांसंदर्भात निर्णय राज्य सरकारवर सोपविण्यात आला होता. राज्य सरकारच्या आदेशानुसार नाशिक महापालिका हद्दीतून जाणाऱ्या त्र्यंबकेश्‍वर रोड व दिंडोरी रोडवरील सुमारे 42 मद्याची दुकाने व बिअरबार पुन्हा सुरू झाली आहेत.

नाशिक महापालिका क्षेत्रातून नाशिक त्र्यंबकेश्‍वर, नाशिक दिंडोरी व नाशिक पेठ हे राज्य महामार्ग तर मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-पुणे महामार्गही जातो. यासंदर्भात मे महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर आले असता, त्या वेळी दिंडोरी रोड व त्र्यंबकरोडवरील बिअरबार व मद्यविक्रीच्या दुकाने सुरू व्हावीत, यासंदर्भात चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांनी त्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार, नाशिक - त्र्यंबकेश्‍वर महामार्गावरील 37 मद्यविक्रीची दुकाने व बिअरबार, तर दिंडोरी रोडवरील पाच दुकाने अशी एकूण 42 मद्याची दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत.

Web Title: nashik news 42 wine shop start in municipal area