नाशिकला भीषण अपघातात मायलेकीसह मावशी ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

नाशिक - जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील गडकरी चौकात आज पहाटे सव्वापाचच्या सुमारास भरधाव बीएमडब्ल्यू कारने सिग्नल ओलांडणाऱ्या स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मायलेकीसह मावशीचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, बीएमडब्ल्यू कारचा चालक फरारी झाला आहे.

अपघातामध्ये योगिनी लीलाधर भामरे (वय 19), सरिता लीलाधर भामरे (वय 35, रा. मूळ जळगाव) व रेखा प्रकाश पाटील (वय 33, रा. मुंबई) या तिघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर लीलाधर भामरे (40) हे गंभीर जखमी आहेत. स्विफ्टचालक शामकुमार पाटील हा किरकोळ जखमी आहे.

जुना मुंबई-आग्रा महामार्गावर गडकरी चौक सिग्नल आहे. लीलाधर भामरे हे मुलींच्या विवाहासंदर्भात अशोकनगर येथील नातलग हर्षल पाटील यांच्याकडे काल मुक्कामी आले होते. आज सकाळी त्यांच्या स्विफ्ट कारमधून (एमएच 15 डीसी 0527) ते सटाणा तालुक्‍यातील ब्राह्मणगाव येथे निघाले होते. शामकुमार पाटील स्विफ्ट कार चालवत होता. मायको सर्कलकडून ते चांडक सर्कलमार्गे गडकरी चौकात आले आणि त्यांच्या कारने गडकरी चौकातून मुंबई नाका सिग्नलकडे वळण घेत असतानाच, त्र्यंबकनाका सिग्नलकडून भरधाव आलेल्या बीएमडब्ल्यू कारने (एमएच 01 एएल 7931) भामरे यांच्या स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातामध्ये स्विफ्ट कारचा मागील भाग पूर्णत: चेपला गेला.

दरम्यान, बीएमडब्ल्यूचा गुप्ता नामक चालक याने अपघातानंतर त्याच्या मित्राला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले आणि त्याच्या गाडीवरून तो फरारी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरारी चालकाचा शोध घेतला जात आहे.

Web Title: nashik news accident in nashik