रिक्त पदांमुळे लेखा विभागात आउटसोर्सिंग नको

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

नाशिक - 'लेखा कर्मचाऱ्यांची एक हजार पदे सध्या रिक्‍त असून, पुन्हा नोकरकपातीचे संकट उद्‌भवल्यास सरकारी कार्यालयीन हिशेबाबाबत गंभीर प्रश्‍न निर्माण होतील. कोणत्याही परिस्थितीत नोकरकपातीचे संकट लेखा कोशागार विभागावर येणार नाही, याची दक्षता आपण घेऊ. या विभागाला आउटसोर्सिंगचा प्रयोग परवडणारा नाही, याची जाणीव सरकारला करून देऊ,' असे प्रतिपादन राज्याचे लेखा व कोशागार संचालक जयगोपाल मेनन यांनी आज येथे केले.

नाशिक विभाग लेखा व कोशागार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे मेनन यांचे संचालक झाल्याबद्दल, तर रस्ते विकास महामंडळाचे संचालक सुनील पिंपळखुंटे यांचा निवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. त्या वेळी मेनन बोलत होते. मेनन म्हणाले, की सरकारी पैशांचा हिशेब व लेखापरीक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. राज्यात साडेचार हजार कर्मचारी त्यासाठी कार्यरत आहेत. सध्या एक हजार पदे खात्यात रिक्त आहेत. त्यात पुन्हा तीस टक्‍के नोकरकपतीचे संकट उद्‌भवल्यास रिक्त पदांचा प्रश्‍न गंभीर होईल. म्हणून या कपातीतून लेखा विभागाला वगळावे. यासाठी आपला आग्रह राहणार आहे. लेखा विभागाचे अधिकारी विविध खात्यांत काम करतात. काही ठिकाणी त्यांना दबावतंत्राचा सामना करावा लागतो. त्यांनी निःसंकोचपणे काम करावे, त्यांचे हक्‍क त्यांना मिळावेत. जबाबदारीने कर्तव्य पार पाडता यावे, यासाठी आपला आग्रह राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: nashik news accounting department not outsourcing by empty post