गुजरातची निवडणूक एक झाकी होती, अजून महाराष्ट्र बाकी 

गुजरातची निवडणूक एक झाकी होती, अजून महाराष्ट्र बाकी 

नाशिक - गुजरात निवडणुकीच्या निकालावरून या मंडळींचे आता फार काळ चालणार नाही, यांच्या पडझडीची ही सुरवात असून, ती शिवसेनेच्या यशाची नांदी आहे. गुजरातची निवडणूक एक झाकी असून, अजून महाराष्ट्र बाकी आहे, असा राज्यात मित्रपक्ष असलेल्या भाजपला टोला लगावत, महाराष्ट्रात शिवसेनेचा फगवा फडकेल, असा विश्‍वास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांनी आज सायंकाळी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात दिंडोरी विधानसभा मतदारसंघात, नाशिक शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन मार्गदर्शन केले. श्री. ठाकरे म्हणाले, की मतदारांना गृहीत धरल्यास काय होते हे गुजरात विधानसभा निवडणुकीत दिसले आहे. गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही चित्र बदलत आहे. जनतेच्या प्रश्‍नांसाठी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी आक्रमक होऊन नागरिकांना दिलासा देण्याचेही त्यांनी आवाहन केले. 

नुकत्याच झालेल्या इगतपुरी पालिका निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले आहे. याचा संदर्भ देत आदित्य ठाकरे म्हणाले, की इगतपुरीतील विजय ऐतिहासिक असून, शिवसेनेच्या यशाची नांदी आहे. या वेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी नाशिक शहर व जिल्ह्यातील संवदेनशील मुद्दे समजून घेत याबाबत कसे आंदोलन करावे, याबाबत चर्चा केली. या वेळी इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर पालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांसह नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सुहास कांदे यांनी श्री. ठाकरे यांचे स्वागत केले. नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. 

केवळ जनतेच्या प्रश्‍नांची चर्चा 
आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना सोशल मीडियावर केवळ एकमेकांना शुभेच्छा देणे व नमस्कार करणे याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की यापुढे युवासेनेच्या अधिकृत व्हॉट्‌सऍप ग्रुपवर शुभ सकाळ व शुभ रात्री, असे संदेश खपवून घेतले जाणार नाहीत. युवकांनी या ग्रुपवर जनसामान्यांशी संबंधित प्रश्‍न मांडून ते कसे सोडवता येतील, याबाबत चर्चा केली पाहिजे. या ग्रुपवर नवीन संकल्पना, आंदोलन, उपक्रम याचीच चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ई-लर्निंग सॉफ्टवेअरचे आज वितरण 
युवासेनेतर्फे नवनीत प्रकाशनाने विकसित करण्यात आलेल्या टॉप स्कोअरर या ई-लर्निंग सॉफ्टवेअरचे महापालिकेतील आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. श्री. ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी (ता. 20) सकाळी साडेअकराला रावसाहेब थोरात सभागृहात विद्यार्थ्यांना टॅब वितरित करण्यात येतील. तसेच खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक सातमधील गंगापूर रोड येथील पोलिस वसाहत महापालिका शाळा क्रमांक 16 मध्ये साकारलेल्या व्हर्च्युअल क्‍लासरूमचे उद्‌घाटन सकाळी अकराला होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com