प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षांच्या अजूनही भळभळताहेत जखमा

प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षांच्या अजूनही भळभळताहेत जखमा

अंबड-कामटवाडा पूर्वीची गटग्रामपंचायत. मात्र, गावपण जपणाऱ्या मोरवाडीसह उंटवाडी या नाशिकच्या बारा वाड्यांपैकी एक. औद्योगिक वसाहतीसाठी १९७३ मध्ये भूसंपादनाचा सरकारचा निर्णय झाला आणि गटग्रामपंचायतीमधून अंबडसह कामटवाडा ग्रामपंचायत स्वतंत्र झाली. त्र्यंबक रामजी दातीर त्या वेळी सरपंच होते. अंबड महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी वामन गंगाराम दातीर सरपंच होते. गटग्रामपंचायतीत १९६५ ते १९७१ मध्ये काळूशेठ धोंडिराम मटाले यांनी, तर १९७२ च्या दुष्काळात दिनकर नारायण मटाले यांनी सरपंच म्हणून काम पाहिले. कामटवाडा महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी नारायण धोंडिराम मटाले सरपंच होते. औद्योगिक वसाहत आणि सिडकोच्या रहिवासी वसाहतीसाठी जमिनींचे संपादन झाले. नंतर तयार झालेल्या प्रश्‍नांच्या जखमा अद्यापही भळभळताहेत...

अंबडची ४३३ हेक्‍टर ७० आर एवढी ३३३ कुटुंबांची जमीन औद्योगिक वसाहतीसाठी संपादित झाली. त्याचा मोबदला म्हणून ४० लाख रुपये दिले. मात्र, त्यासाठी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना भूखंड देऊ, कुटुंबातील सदस्यांना नोकरी देऊ, गाव दत्तक घेऊन विकास करू, बागायती क्षेत्रातील विहिरी, पिकांचे पैसे देऊ, अशी तोंडी आश्‍वासने दिली गेली; पण तक्रार करूनही मोबदला घेतला गेला नाही, ही व्यथा आताच्या पिढीची आहे. त्या वेळी जमिनी दिल्या नाहीत, तर जबरदस्तीने घेतल्या जातील यांसह १९७२ च्या दुष्काळाने झालेली होरपळ या भीतीने जमिनी दिल्याचे सांगितले जात आहे. १९७६ मध्ये नाव देण्याच्या अटीवर एका कंपनीने शाळा बांधून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकहाती कारभारात त्यास प्रतिसाद मिळाला नाही. पूर्वी पूर्व बाजूला असलेल्या २० फूट खोल नाल्यात सहा महिने पाणी राहायचे. नाल्यातून किमान चार महिने बाहेरचा संपर्क राहायचा नाही. अंबड-कामटवाडा-नाशिक दलदलीचा रस्ता असायचा. त्यामुळे गावात जायचे झाल्यास बैलगाडीचा वापर करावा लागायचा. १९७४ पर्यंत दळवळणासह शेतीची साधने आणि मोटारसायकल गावात नव्हती. बागायती क्षेत्र कमी असल्याने विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागायचे. शिक्षण, व्यापार, सरकारी नोकरीचा अभाव होता. दीड हजार एकरावर शेती केली जायची. खरीप, रब्बीची पिके घेतली जायची. त्यात ज्वारी, बाजरी, गहू, कडधान्यांचा समावेश होता. ७५ टक्के दातीरांची वस्ती असलेल्या अंबड गावात फडोळ, शिरसाट, मोरे, कर्डिले, मांडे, घुले, दोंदे, जाधव, आहेर, सारिकते, डोकफोडे अशी कुटुंबे होती. सालावर, रोजंदारीवर बहुतांश जण काम करायचे. हनुमान जयंतीला एक दिवसाची यात्रा भरायची. कुस्त्यांची दंगल, टांगा शर्यती व्हायच्या. शंकरराव दातीर, रामकृष्ण जिवराम दातीर, दामू कर्डिले, बच्चू कर्डिले, निवृत्ती दातीर, भिका मांडे, रामकृष्ण काळू दातीर यांनी पहिलवान म्हणून नाव कमावले होते. सामुदायिक विहिरीवरून महिला डोईवरून पिण्यासाठी पाणी आणत. सार्वजनिक खुल्या जागेत स्मशानभूमी होती. तेथेच दशक्रिया विधी व्हायचे. पूर्वेला मुंबई-आग्रा महामार्ग, पाथर्डी, पश्‍चिमेला चुंचाळे, दक्षिणेला विल्होळी, उत्तरेला कामटवाडा अशी गावाची शीव होती. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी स्थापन झाल्यावर शेतीला कर्ज मिळू लागले आणि शेतीचा विकास झाला.

दातीर, फडोळ, मोरे, कर्डिले अशी कुटुंबे आता २०० एकर शेती कसतात. त्यातील २५ एकरावर द्राक्षे आहेत. भाजीपाल्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. १९७७ ते १९८० मध्ये बिनशेती न केल्यास सरकारला जमिनी जमा होतील, असा समज तयार झाल्याने ५ ते १५ हजार रुपये एकर भावाने जमिनी विकल्या गेल्या. दीडशे एकर जमीन विकली गेली. अंबडचा महापालिकेत समावेश झाल्यावर वारशाने नावे लागत गेली आणि कुटुंबांमधील वाद वाढीस लागला. महापालिका झाल्यापासून आतापर्यंत या भागातून मंदाताई दातीर, सुमनताई फडोळ, संध्या आहेर, तानाजी फडोळ, शोभा फडोळ, उत्तम दोंदे यांनी प्रतिनिधित्व केले. आताच्या निवडणुकीत काकाविरुद्ध पुतण्याच्या लढतीत राकेश दोंदे यांनी बाजी मारली. 

सुमीत कंपनीमागे नऊ हजार लोकसंख्येचे दत्तनगर, महालक्ष्मीनगर, कृष्णनगर, नवनाथनगर, डीजीपीनगर-दोन, उपेंद्रनगर, माणिकनगरसह गायरानात ७० एकरावर वसलेल्या शांतीनगर, गौतमनगर, रमाबाईनगर झोपडपट्यांमधील लोकसंख्या १४ हजारांपर्यंत असून, शंभर मळ्यांमधील लोकसंख्या तीन हजारापर्यंत आहे. मळे भागात राहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी खोल्या बांधून त्या कामगारांना भाडेतत्त्वावर देत उदरनिर्वाहाचे साधन निर्माण केले. अंबड शिवारातील लोकसंख्या ३५ हजारांपर्यंत पोचली असून, सोळाशे कारखान्यांपैकी अकराशे कारखाने नोंदणीकृत आहेत. त्यातील ४० टक्के कंपन्या बंद पडल्या आहेत. नवीन कंपन्या येत नसल्याने रोजंदारीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 

साडेसात एकरावरील कॉन्टिन्टेल कास्टिंग, आठ एकरावरील मेल्ट्रॉन, पाच एकरावरील सुमीत या बंद पडलेल्या कंपन्यांचे उदाहरण स्थानिक देतात. गावात महापालिकेच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या तीन शाळा असून, त्यात दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शिवाय जितमल छाजेड ही पाचवी ते दहावीपर्यंतची, दत्तनगरमधील मुकेशभाई पटेल आणि ग्लोबल व्हीजन शाळा आहे. अंबडमधील निवासी भागातून एक कोटी ४९ लाखांचा, तर औद्योगिक वसाहतीमधून तीन कोटी ५३ लाखांचा कर महापालिकेत जमा होतो. त्याचा विचार करता, विकासासाठी खूपच कमी प्रतिसाद मिळत असल्याची ठसठस स्थानिकांत आहे.

लोकवस्ती पोचली ६० हजारांपर्यंत
मौजे कामटवाड्यात मटाले कुटुंबीयांचे २५ उंबरे होते. शिवाय दोंदे, जाधव, बुकाणे, नाईक, बर्डे, निकम, पवार, धोंगडे, दिवे, गुंजाळ, पठाणे रहिवासी. ग्रामपंचायत असताना लोकवस्ती ३०० पर्यंत होती. स्थानिकांची शेती ५०० एकरापर्यंत होती. त्यात बाजरी, उडीदसह उखळात कांडल्या जाणाऱ्या सुगंधी तांदळाच्या पेरसाळचे उत्पादन घेतले जायचे. शेतातील भाजीपाला डोईवर नेऊन महात्मा फुले मंडईत विकला जायचा. २५ ते ५० पैशांमध्ये भाजीपाल्याचे ओझे विकले जायचे. गाई, म्हशी, बैल, शेळ्या अशी संपत्ती शेतकऱ्यांकडे होती. परसबागेत कोंबड्या असायच्या. वाढत्या नागरिकरणात लोकवस्ती ६० हजारांपर्यंत पोचली. पुंजा मटाले, चिंधू मटाले, तुकाराम मटाले, मंदाताई मटाले, राजू दिवटे, बाळासाहेब मटाले अशा शेतकऱ्यांनी अजूनही २५ एकरापर्यंत शेती सांभाळली आहे. त्यात द्राक्षे घेतली जायची. आता भाजीपाला, चारा पिके घेतली जातात. खुटवडनगर, बरूबाबानगर, वेणूनगर, कार्तिकेयनगर, त्र्यंबकेश्‍वरनगर, रामेश्‍वरनगर, मटालेनगर, दिवटे मळा, कामटवाडा गाव, चाणक्‍यनगर, पांडवनगरी, मोगलनगर, गुलमोहर कॉलनी, भोळे मंगल कार्यालय, मुक्ताई सोसायटी, मटाले मळा, दुर्गानगर, इंद्रनगरी, आम्रछाया सोसायटी, साळुंखेनगर, जाधव संकुल, माउली लॉन्स, म्हसोबानगर, बंदावणेनगर, अभियंतानगर, अजिंक्‍य व्हिलेज, धन्वंतरी वैद्यकीय महाविद्यालय इतका मोठा विस्तार शिवाराचा झाला आहे.

आमदार वाहून गेलेले उंटवाडी
तिडके, गाढवे, जगताप, नाईक, बोंबले यांच्यासह पोलिसपाटीलकीपोटी जमीन मिळालेले पाटील उंटवाडीमधील मूळचे. तिडके जुन्या नाशिकमधील छपरीची तालीम भागात राहायचे आणि इथली जमीन कसायचे. गाढवे भद्रकालीत राहायचे. तिडके कॉलनी ते त्रिमूर्ती चौक या भागातील ३५० एकर जमिनीत मार्च-एप्रिलपर्यंत नंदिनी नदी वाहत असली, तरीही विहिरीच्या पाण्यावर पिके घेतली जायची. भोकरी वाणाची द्राक्षे, भाजीपाला पिकांचा त्यात समावेश होता. आमदार भिकचंद दोंदे वाहनासह वाहून गेलेला उंटवाडी पूल ओळखला जाऊ लागला. आदिवासींची ५० घरे होती. इतर मळ्यांमध्ये विखुरले होते. पालिका असताना उद्यानासाठी आरक्षण टाकले होते. त्यासंबंधाने मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्याने आरक्षण उठवून ‘ग्रीन झोन’ कायम ठेवला होता. आता तिडके मळा, गोविंदनगर, बाजीरावनगर, खांडेनगर, वझरेनगर, जगतापनगर, पाटीलनगर असा परिसराचा विस्तार झाला आहे. इथली म्हसोबाची यात्रा प्रसिद्ध आहे.

‘नटसम्राट’मधील मोरवाडी
आव्हाड, जायभावे, गामणे, घुगे, सोनवणे, महाले, तडाखे, मोरे, कोरडे, शिरसाठ आदी कुटुंबीयांच्या मोरवाडीत दोन गल्ल्या होत्या. त्या वेळची लोकसंख्या पाचशेच्या आसपास होती. हजारभर एकरावर शेती केली जायची. दुग्धोत्पादन हा जोडधंदा होता. बाजरी, गहू, उडीद, मका, ज्वारीसह भाजीपाल्याचे उत्पादन विहिरींच्या पाण्यावर घेतले जायचे. भाजीपाला महात्मा फुले मंडईत विकला जायचा. पुंडलिक तिडके नगरसेवक म्हणून निवडून गेले. महापालिकेत हा भाग समाविष्ट होत असताना ते नगराध्यक्ष होते. १९९२ मध्ये नानासाहेब महाले यांनी नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले. पांगरे मळा, बडदे मळा, कांबळे मळा याच भागातील. महामार्ग, जुने सिडको बसथांबा, सावतानगर, उंटवाडी अशी शीव असलेल्या या भागात आता अश्‍विननगर, सह्याद्रीनगर, उत्तमनगर, सिंहस्थनगर, राजरत्ननगर, साईबाबानगर, पंडितनगर, विजयनगर, स्वामी विवेकानंदनगर, अंबड पोलिस ठाणे, श्रीरामनगर, पवननगर आणि सावतानगरचा परिसर, स्टेट बॅंक, गणेश चौक, राणाप्रताप चौक, जुने सिडको, शिवाजी चौक असा विस्तार झाला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज इथल्या टेकडीवर फिरायला यायचे. त्यांच्या गाजलेल्या ‘नटसम्राट’ नाटकात मोरवाडीच्या उल्लेखाचा अभिमान स्थानिकांमध्ये आहे. आता याच मोरवाडी शिवारातील लोकवस्ती दोन लाखांच्यापुढे पोचली आहे.

सात-बारा उतारा असलेल्यांच्या नावाने औद्योगिक वसाहतीच्या मोबदल्याचे पैसे वाटप करण्यात आले. कुटुंबांनी ते आपसांत वाटून घेतले; पण कर्त्याच्या नावावर सात-बारा असल्याने सरकारच्या निर्णयानुसार मिळणाऱ्या भूखंडाच्या प्रश्‍नांवरून कुटुंबांमध्ये वादाला तोंड फुटले. मोरे कुटुंबाची सव्वाशे एकर, शिरसाट कुटुंबातील शंभर एकर क्षेत्र संपादित केलेले असताना शंभर वाराचा, तर दहा गुंठे जमिनीच्या बदल्यात तेवढाच भूखंड देण्याच्या व्यस्त प्रमाणामुळे वाद उफाळत गेला. अजूनही सर्वांना भूखंड मिळाले नाहीत. स्थानिकांना नोकरीचा पत्ता नाही.
-पंढरीनाथ दातीर

औद्योगिक वसाहतीसाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाच्या मोबदल्याप्रश्‍नी आंदोलन केल्यावर भूखंडाचा विषय पुढे आला. मात्र, अजूनही सरकारकडून शब्दांची पूर्तता होत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या वेदना कायम आहेत. आमच्या कुटुंबीयांनी जमिनी दिल्या, तरीही पायाभूत सुविधा पुरवण्यात दिरंगाई केली जाते. अभ्यासिका, वाचनालय, व्यायामशाळा, प्रशिक्षण केंद्र, समाजमंदिर, बसथांबा, उद्यान, भाजी मार्केट, झोपडपट्ट्यांमधील गलिच्छपणा असे प्रश्‍न अद्याप सुटलेले नाहीत.
-साहेबराव दातीर

आयटीआय सिग्नल ते डीजीपीनगर ऐंशीफुटी रस्ता होता. प्रत्यक्षात तो साठफुटी केला आणि सरळऐवजी वळण देण्यात आले. महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचवायला हवा. वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, क्रीडांगण, अभ्यासिका, कमी दाबाने येणारे पिण्याचे पाणी हे प्रश्‍न सुटायला हवेत. उद्यानांची दुरवस्था संपुष्टात यावी. जवळपास ३० एकरापर्यंत सोडण्यात आलेली खुली जागा कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी व्यापली असल्याने स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
-बाळासाहेब मटाले

सिडकोतर्फे जमिनी संपादित झाल्या आहेत. अजूनही ५२ टक्के मोबदला मिळायचा आहे. मातीमोल भावाने जमीन घेतल्यावर शेतकऱ्यांना चढ्या भावाने भूखंड घ्यावे लागले आहेत. प्रकल्पग्रस्तांना अद्याप भूखंड, घरे मिळालेली नाहीत. कुटुंबातील सदस्यांना नोकरी देऊ, पिठाची गिरणी देऊ, असा शब्द दिला होता. प्रत्यक्षात मोजक्‍या तरुणांना नोकरी मिळाली आणि पिठाची गिरणी मिळाली आहे.
- नानासाहेब महाले 

वाढीव मोबदल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर १२ टक्के विकसित भूखंड अद्याप ५० कुटुंबीयांना मिळणे बाकी आहे. तारा भूमिगत कराव्यात. गावठाणातील नाला बंदिस्त करावा. सिडकोकडून मंगल कार्यालयासाठी जागा मिळायला हवी. सिडकोने हजाराहून अधिक एकर संपादित केलेल्या जागेत ६५ टक्के क्षेत्र मोरवाडीतील असल्याने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न प्राधान्याने सुटायला हवेत.
- तानाजी जायभावे 

पाटीलनगरमधील ७० एकर क्षेत्र सिडकोने संपादित केले. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १२ टक्के विकसित भूखंड मिळणे बाकी आहे. व्यावसायिक भूखंड ५० टक्के शेतकऱ्यांना आणि सर्वच प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली नाही. शीव रस्त्यांचा विकास झाला नाही. विकास आराखड्यातील त्रिमूर्ती चौक ते सपना थिएटर ते म्हसोबा मंदिर या रस्त्याचा विकास व्हायचा आहे. २५ एकरावर आरक्षण पडून असून, त्याचा विकास अपेक्षित आहे.
- केशवअण्णा पाटील  

१९९६ मध्ये पिवळा पट्टा झाल्यावर ले-आउट पडले. मात्र, या भागात रस्त्यांचा विकास झालेला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. मळे भागात पिण्याचे पाणी, रस्ते, वीज या पायाभूत सुविधा पोचायला हव्यात.
- बाजीराव तिडके  

रुग्णालय, जॉगिंग ट्रॅक, बसथांबा, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरी हे प्रश्‍न सुटायला हवेत. खुल्या जागेवर महिलांच्या स्वयंरोजगाराचे केंद्र विकसित करायचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी लवकर शिबिर घेणार आहोत.
-राकेश दोंदे, नगरसेवक

अंबडमधील मळे शिवारात गटार, पाणी, रस्ते ही कामे व्हायला हवीत. मळ्यांमधील रस्त्यांचे रुंदीकरण केले जावे. तसेच, औद्योगिक वसाहतीत रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रकचा प्रश्‍न निकाली निघावा. कंपन्यांच्या रासायनिक पाण्यामुळे विहिरींमधील पाणी दूषित झाल्याने शेतीवर झालेल्या विपरीत परिणामाचा प्रश्‍न मिटवावा.
-शांताराम फडोळ, स्थानिक रहिवासी

उपेंद्रनगर पूर्वी गुन्हेगारांचे माहेरघर होते. आता ती स्थिती राहिलेली नाही. रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. कमी दाबाने येणाऱ्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघावा. पथदीप सुरू राहावेत.
-वैशाली चौधरी, स्थानिक रहिवासी

घंटागाडी वेळेवर यावी. नाना-नानी पार्क उभारले जावे. विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे व्हावीत. कंपन्यांनी परिसराच्या विकासावर लक्ष द्यावे. दत्तनगर भागातील गटार, पाणी, रस्ता, पथदीपांचा प्रश्‍न सुटावा.
-हिरामण दातीर, स्थानिक रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com