बालकांना आहार देण्यास "आशां'चा नकार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

नाशिक - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला गावोगावच्या आशा व गटप्रवर्तकांनीही पाठिंबा दिला आहे. ग्रामपंचायतींना पत्र पाठवून अंगणवाडीतील बालकांना पूरक आहार देण्याचे आदेश सरकारने काढले; परंतु आशा कर्मचाऱ्यांनी अंगणीवाडीतील बालकांना आहार पुरवण्यास नकार दिला आहे. यामुळे आशांच्या मदतीने बालकांना पूरक आहार पुरवण्याच्या सरकारचे प्रयत्न सपशेल फसले आहे. 

नाशिक - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला गावोगावच्या आशा व गटप्रवर्तकांनीही पाठिंबा दिला आहे. ग्रामपंचायतींना पत्र पाठवून अंगणवाडीतील बालकांना पूरक आहार देण्याचे आदेश सरकारने काढले; परंतु आशा कर्मचाऱ्यांनी अंगणीवाडीतील बालकांना आहार पुरवण्यास नकार दिला आहे. यामुळे आशांच्या मदतीने बालकांना पूरक आहार पुरवण्याच्या सरकारचे प्रयत्न सपशेल फसले आहे. 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून राज्यातील सर्व सेविका व मदतनीस बेमुदत संपावर गेल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या कृती समितीची सरकारबरोबर झालेली बोलणी फिसकटल्यामुळे संप आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 27 सप्टेंबरला मुंबईत आझाद मैदानावर राज्यातील अंगणवाडीसेविका आंदोलन करणार आहेत. या सर्व घडामोडींत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मार्फत बालकांना शिक्षण, पूरक आहार, किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर माता यांना पुरवल्या जाणाऱ्या आहाराकडे मात्र, पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. 

आदिवासी व दुर्गम भागांत कुपोषण व कमी वजनाच्या मुलांचा गंभीर प्रश्‍न असूनही त्याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्यामुळे ही बालके पूरक आहारापासून वंचित आहेत. सरकारने ग्रामपंचायतींना पत्र पाठवून आशा, ग्रामसेवक, तलाठी यांच्या मदतीने पूरक आहार पुरवण्याचे आदेश काढून जबाबदारी पार पाडल्याचे भासवले आहे; परंतु प्रत्यक्षात कार्यवाही काहीही झाली नाही. जिल्ह्यात साडेतीन हजार आशा कर्मचारी असून, त्यांच्यामार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कामे करून घेऊ, असा सरकारचा अंदाज होता; परंतु आशा कर्मचाऱ्यांनी पूरक आहार पुरविण्यासाठी मदत करण्यास नकार दिल्यामुळे महिला व बालविकास विभागासमोर कुठलाही पर्याय दिसत नाही. 

आशा कर्मचाऱ्यांनी पूरक आहार पुरविणार नाही, असे पत्र दिल्यामुळे अंगवाडीतील बालकांना आहार पुरवणे अशक्‍य होत आहे. सरकारने उपाययोजनांबाबत पत्रही दिले आहे. पुढील दोन-चार दिवसांमध्ये यावर तोडगा काढून बालकांना पूरक आहार पुरविण्याची व्यवस्था करू. 
- दत्तात्रेय मुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास विभाग. 

अंगणवाडीसेविका या कर्मचारी असून त्यांच्या मागण्या रास्त आहेत. यामुळे आशा कर्मचाऱ्यांनी त्यांची कामे करण्यास नकार दिला आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशीच आमची भूमिका असल्यामुळे आमच्या आशा गट प्रवर्तक संघटनेच्या सदस्या पूरक आहार पुरविणार नाहीत. 
- राजू देसले, अध्यक्ष, आशा व गट प्रवर्तक संघटना 

Web Title: nashik news anganwadi children food