नाशिककर अंजलीच्या 'न्यूटन'कडून ऑस्करची उम्मीद 

दीपिका वाघ
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

नामांकन मिळाल्याचे वृत्त समजल्यावर खूप आनंद झाला. सर्वांत आधी माझ्या घरच्यांना कळविले. लॉस एंजिल्समध्ये राहणाऱ्या माझ्या बहिणीला अर्चना कळविले. आमच्या दोघींचे लहानपणासून स्वप्न होते, की ऑस्करसाठी जायचे. मग तो चित्रपट माझा असो वा बहिणीचा. असे वाटतेय, की चांगल्या गोष्टी होतात; थोडासा वेळ लागतो, पण होतात. 
- अंजली पाटील (अभिनेत्री) 

नाशिक - दी ऑस्कर गोज टू.... निवेदकाचं नुसतं असं वाक्‍य कानी पडणं आणि पुरस्काराच्या रूपाने ऑस्करची बाहुली मिळणं, हे प्रत्येक कलावंताचं स्वप्न असतं. किंबहुना हे प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्या तोडीच्या चित्रपटासह सर्वच बाबींकडे ही टीम अपार मेहनत, कष्ट घेते. अमित मसूरकर दिग्दर्शित "न्यूटन' हा छत्तीसगडमधील नक्षलवाद, राजकारण आणि निवडणूक यांसारख्या विषयाला वाहिलेला वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा विभागात 2018 चे नामांकन मिळाले. त्यात मराठमोळ्या नाशिककर अंजली पाटील हिची भूमिका आहे. ऐन नवरात्रोत्सवात दुसऱ्या माळेला नाशिककरांना ही "गुड न्यूज' मिळाली. या देदीप्यमान कामगिरीने अंजलीच्या "न्यूटन'कडून ऑस्करची उम्मीद वाढली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया समितीने आज ही घोषणा केली. 

सव्वीस भारतीय चित्रपटांमधून "न्यूटन'ला नामांकन मिळाले आहे. 67 व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये "न्यूटन'चा प्रीमिअर झाला होता. हॉलिवूडच्या ऑस्करचे आकर्षण सर्वच कलावंतांना असते. पुरस्कारापेक्षाही आपल्या चित्रपट, भूमिका, संगीत, कथेला नामांकन मिळणे हीसुद्धा संबंधितांसाठी मोठी गोष्ट असते. नुसते नामांकन मिळाले, तरी आनंद, उत्साहाला पारावर राहत नाही. नाशिककर अंजली पाटीलही सर्वसामान्य घरातील अशीच मुलगी. खिडकीत बसून मोठ्या शहरात झेप घेण्याचे, यश मिळविण्याचे स्वप्न तिने पाहिले. तिला अंकगणितापेक्षा चित्रपटाच्या पात्रांसाठी आवश्‍यक असणाऱ्या अभ्यासात विशेष रस आहे. पुण्याच्या ललित कला केंद्रातून अभ्यास पूर्ण करून दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाते. संघर्ष करते, मेहनत करते. सुरवातीला छोट्या-मोठ्या भूमिका करते, पण त्यात ती भाव खाऊन जाते. शेवटी केलेले कष्ट कधी वाया जात नाहीत. त्याला कधी ना कधी यश मिळतेच, अशी भावना "न्यूटन' नामांकनानंतर अंजलीने व्यक्त केली. 

"न्यूटन'ची अनोखी छाप  
दृश्‍यम फिल्मनिर्मित आणि मराठमोळा अमित मसूरकर दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार राव, अंजली पाटील, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, रघुबीर यादव यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. छत्तीसगड, झारखंड यांसारख्या नक्षलग्रस्त भागात प्रामाणिक काम करणारा कारकून नूतन (न्यूटन) कुमार एक आदर्श कर्मचारी दाखविण्यात आला आहे. तेथील राजकारण, मतदान व निवडणूक या परिस्थितीवर हा चित्रपट भाष्य करतो. अंजलीने या चित्रपटात कोंडी आदिवासी (मल्को) नावाच्या शिक्षिकेची भूमिका केली आहे. ती नव्या पिढीचे  प्रतिनिधित्व करणारी मुलगी आहे. कोंडी आणि हिंदी अशा दोन्ही भाषा ती बोलते. निवडणुकीची ड्यूटी लागलेली ही शिक्षिका दुभाषा म्हणून काम करताना "न्यूटन' चित्रपटात दिसत आहे. मल्याळी, तेलुगु, तमीळ, मराठी, श्रीलंकन, हिंदी व इंग्रजी या भाषांत अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या तिला 2013 मध्ये "ना बंगारू" (तेलुगु) चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. भविष्यात तिला दिग्दर्शन करायचे आहे. सध्या ती संहितेवर काम करत आहे. अभिनेता रजनीकांतसोबत ती "काला' चित्रपटाचे शूटिंग करत आहे, तसेच "मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' नावाच्या चित्रपटात दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत काम करत आहे. 

अमिताभसह इतरांकडून कौतुक  
ऑस्कर 2018 च्या नामांकनाची घोषणा होताच सोशल मीडियावर अभिनंदनपर शुभेच्छांचा पाऊस पडला. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. समीक्षकांनी या चित्रपटाला 4.5 ते 5 स्टार देत "न्यूटन'चे कौतुक केले आहे. 90 व्या ऍकॅडमी ऍवॉर्डचा सोहळा 4 मार्च 2018 ला लॉस एंजिल्स येथे होईल. 

एकाच महिन्यात किमया 
अंजलीचा 8 सप्टेंबरला "समीर' चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात तिने सेलिब्रिटी फोटो जर्नालिस्ट आलिया नावाची भूमिका करत आहे. बॉंबस्फोट होतो तेव्हा सर्वप्रथम माहिती तिला मिळते. 22 सप्टेंबरला "न्यूटन' आणि "उम्मीद' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. तो उत्तेजक द्रव्याच्या रॅकेटवर आधारित चित्रपट आहे. यात अंजली "एनजीओ' चालवत आहे. 

Web Title: nashik news anjali patil Newton Oscar