‘एव्हिएशन हब’च्या दिशेने ओझर-नाशिकची वाटचाल..!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

नाशिक - केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत मुंबई व पुणे शहरांशी हवाई सेवेने नाशिक जोडले. त्यानंतर येत्या वर्षाअखेर देशातील सात महत्त्वाच्या शहरांना जोडले जाण्याची प्रक्रियाही वेग घेत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या दृष्टीने नाशिक हे महत्त्वाचे शहर बनले असून, ‘ओझर विमानतळ’ विमान सेवेचे हब होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

एअर डेक्कनने स्वतःपुरती तशी घोषणाही केली असून, ओझर विमानतळावर नाइट लॅंडिंगची झालेली सोय हे त्यामागचे प्रमुख कारण ठरले आहे.

नाशिक - केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत मुंबई व पुणे शहरांशी हवाई सेवेने नाशिक जोडले. त्यानंतर येत्या वर्षाअखेर देशातील सात महत्त्वाच्या शहरांना जोडले जाण्याची प्रक्रियाही वेग घेत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या दृष्टीने नाशिक हे महत्त्वाचे शहर बनले असून, ‘ओझर विमानतळ’ विमान सेवेचे हब होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

एअर डेक्कनने स्वतःपुरती तशी घोषणाही केली असून, ओझर विमानतळावर नाइट लॅंडिंगची झालेली सोय हे त्यामागचे प्रमुख कारण ठरले आहे.

केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ डिसेंबर महिन्यात झाला. पहिल्या टप्प्यात नाशिकमधून मुंबई व पुणे येथे सेवा सुरू झाली. पुणे सेवेपाठोपाठ मुंबई सेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. उडानचा पहिला टप्पा यशस्वी होत असताना उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक देशातील सात महत्त्वाच्या शहरांना जोडले जाणार आहे. नाशिकहून अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, दिल्ली, गोवा, गाझियाबाद, हैदराबाद या महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत विमान कंपन्यांना या शहरांशी हवाई सेवेने जोडण्यासाठी मार्ग देण्यात आले आहे. येत्या वर्षाअखेर नाशिकमधून या शहरांना जोडणारी हवाई सेवा सुरू होईल. ७३ शहरांत नाशिकला सर्वाधिक हवाईमार्ग निश्‍चित करण्यात आले.

एअर डेक्कनच्या दृष्टीने हब
आम आदमीचा प्रवास विमानातून व्हावा, यासाठी एअर डेक्कन कंपनीने उडान योजनेत पुढाकार घेतला. देशातील नऊ शहरांत सेवा सुरू करताना एअर डेक्कन कंपनीच्या दृष्टीने नाशिक हब झाल्याचे कंपनीचे सेल्स व मार्केटिंगचे प्रमुख जिगर थालेश्‍वर यांनी शनिवारी (ता. २७) सांगितले. मुंबई विमानतळ जगातील सर्वांत वर्दळीचे विमानतळ ठरले आहे. येथे नाइट लॅंडिंगसाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे नाशिकच्या ओझर विमानतळावर नाइट लॅंडिंगची सुविधा असल्याने येथे रात्रीच्या वेळी विमाने पार्किंग करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एअर डेक्कनच्या दृष्टीने ओझर विमानतळ ‘विमान सेवेचे हब’ झाल्याचा दावा थालेश्‍वर यांनी केला.

महिनाभरात २८ दिवस विमानसेवा देण्यास यशस्वी झाल्याचे सांगताना नाशिक-पुणे सेवेला ७५ टक्के, तर मुंबई सेवेला ६० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे थालेश्‍वर यांनी माहिती दिली. ‘तान’तर्फे घेण्यात आलेल्या ‘हॉलिडे कार्निव्हल’ कार्यक्रमात विमानसेवेबद्दलच्या अडचणी यावर चर्चा करताना त्यांनी माहिती दिली. या वेळी ‘तान’चे अध्यक्ष दत्ता भालेराव, चौधरी यात्रा कंपनीचे ब्रिजमोहन चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र बकरे, मनोज वासवाणी आदी उपस्थित होते.

विमान कंपन्यांसाठी फायदेशीर
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४ तासांत ९६५ विमानांचे उड्डाण होत असल्याची नोंद झाली. ते जगातील सर्वांत वर्दळीचे विमानतळ ठरले आहे. येथे विमानांचे लॅंडिंग करण्यापूर्वी आकाशात अर्धा तास घिरट्या माराव्या लागतात. रात्रीच्या वेळी विमान पार्किंगला जागा नसल्याने अहमदाबाद, हैदराबाद व बडोदा येथे पार्किंगसाठी जातात. उडान योजनेंतर्गत ओझर विमानतळ प्राप्त झाल्याने विमान कंपन्यांसाठी चांगली संधी प्राप्त झाली आहे. नाइट लॅंडिंगची सुविधा, साडेतीन किलोमीटरची धावपट्टी, मुंबईपासून जवळचे हवाईअंतर यामुळे विमान कंपन्यांना फायदा होणार असल्याने उडान योजनेत नाशिकला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: nashik news aviation hub