आमदार बच्चू कडूंच्या दौऱ्याचा जिल्हा परिषदेने घेतला धसका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नाशिक - अपंग कल्याणासाठी खर्च करायची 3 टक्के रक्‍कम पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेत पडून आहे. त्याची माहिती घेण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू बुधवारी (ता. 27) येणार आहेत. त्याचा धसका घेत आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिवसभर अपंग कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रस्ताव तयार केले. 

नाशिक - अपंग कल्याणासाठी खर्च करायची 3 टक्के रक्‍कम पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेत पडून आहे. त्याची माहिती घेण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू बुधवारी (ता. 27) येणार आहेत. त्याचा धसका घेत आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिवसभर अपंग कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रस्ताव तयार केले. 

आमदार कडू दोन महिन्यांपूर्वी नाशिक महापालिकेत अपंग कल्याण निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी आले असताना, त्यांचा दौरा वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर श्री. कडू यांच्याकडे जिल्हा परिषदेतील अखर्चित निधीबाबतही तक्रारी गेल्याने त्यांनी जिल्हा परिषदेला पत्र देऊन अपंग कल्याण निधीच्या खर्चाबाबत विचारणा केली. या निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी श्री. कडू येणार असल्यामुळे अपंग कल्याण विभाग व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. 

अपंग कल्याण निधीपैकी 75 टक्के रक्कम अपंगांच्या सार्वजनिक योजनांसाठी, तर 25 टक्के रक्कम वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी खर्च करण्याचा नियम आहे. त्यानुसार चार कोटी 80 लाखांपैकी जिल्हा परिषदेच्या जुन्या व नव्या इमारतीत लिफ्ट बसवण्यासाठी 70 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनाही त्यांच्याकडे असलेला निधी खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. अपंगांना ओळखपत्र देण्याचे काम सुरू केले असून, त्यासाठी वेळापत्रक तयार केल्याचेही त्यांनी सांगितले. अपंगांसाठी वैयक्तिक लाभाच्या 34 योजना असून, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव मागविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास दीड हजार अर्ज आले असून, साधारण साडेचार हजार अर्ज येतील, असा अंदाज असल्याचे श्री. मिणा यांनी सांगितले. . 

अपंग कल्याण निधी हा मागील चार वर्षांपासून अखर्चित आहे. मी व पदाधिकारी नवीन असलो, तरीही मागील पाच महिन्यांपासून या निधीच्या खर्चाचे नियोजन सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत या निधीचे पूर्ण नियोजन केले जाईल. 
- दीपककुमार मिणा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक 

Web Title: nashik news Bacchu Kadu