कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आंबेडकर अनुयायी जिल्ह्यात रस्त्यावर

मनमाड - संतप्त भीमसैनिकांनी बुधवारी मनमाड रेल्वेस्थानकावर बेंगळुरू-नवी दिल्ली ही कर्नाटक एक्‍स्प्रेस सुमारे २० मिनिटे रोखून धरली.
मनमाड - संतप्त भीमसैनिकांनी बुधवारी मनमाड रेल्वेस्थानकावर बेंगळुरू-नवी दिल्ली ही कर्नाटक एक्‍स्प्रेस सुमारे २० मिनिटे रोखून धरली.

नाशिक - कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या दिलेल्या हाकेला चळवळीची भूमी असलेल्या नाशिक शहर व जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. 

नेत्यांना न जुमानता नाशिकमधील द्वारका चौकात कार्यकर्त्यांनी चार तास रास्ता रोको आंदोलन केले. बाजार समितीमधील आठवडे जनावरांच्या बाजारात दगडफेकीची घटना घडली. मनमाड येथे भीमसैनिकांनी कर्नाटक एक्‍स्प्रेस वीस मिनिटे रोखून धरली. टाकळी- विंचूर, मनमाड-लासलगाव रस्त्यावर काचा फोडण्यात आल्या. नामपूरमध्ये आक्रोश मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संभाजी भिडे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. बसस्थानक भागात टायर पेटविण्यात आले.

आजच्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने शहर वाहतुकीच्या जोडीलाच जिल्ह्यातील बसगाड्या बसस्थानक, आगाराच्या बाहेर काढल्या नाहीत. ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसगाड्या, टॅक्‍सी, रिक्षाचालकांनीही प्रवासी वाहतूक केली नाही. त्यामुळे प्रवाशांची आज दुसऱ्या दिवशी तारांबळ उडाली. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर मोठा परिणाम झाला. शहरातील शिवाजी रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून निषेध रॅली काढण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला.

त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले. त्याच वेळी कार्यकर्ते आंदोलनासाठी द्वारका चौकाकडे रवाना झाले. दरम्यान, गोदाकाठी भरणारा आठवडे बाजार निम्मा होता. बाजार समित्यांत शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणणे पसंत न केल्याने लिलाव झालेल्या बाजार समित्यांमधील आवक २० टक्‍क्‍यांपर्यंत राहिली. त्याच वेळी भावात घसरण झाली. 

दिंडोरी, मोहाडी, वणी, उमराळे, सिद्धपिंप्री, नामपूर, सटाणा, जायखेडा, डांगसौंदाणे, निफाड, ओझर, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, देवळा, नांदगाव, येवला, इगतपुरी, नांदगाव, मालेगाव, कळवण, चांदवडमध्ये बंद पाळण्यात आला. नाशिक शहरातील विविध भागांतील बाजारपेठांमधील व्यवहार बंद राहिले.

सीबीआय चौकशीची काँग्रेसची मागणी
दलित बांधवांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने निषेध केला आहे. या भ्याड हल्ल्यात सहभागी झालेल्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पक्षातर्फे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या वेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर काळे, नगरसेविका वत्सलाताई खैरे, डॉ. हेमलता पाटील, दिनेश उन्हवणे, सुनील आव्हाड, मिलिंद हांडोरे आदी उपस्थित होते.

पडसाद आंदोलनाचे...
द्वारका चौकात नेत्यांना न जुमानता चार तास रास्ता रोको आंदोलन
बाजार समितीमधील आठवडे जनावरांच्या बाजारात दगडफेक
मनमाडमध्ये भीमसैनिकांनी कर्नाटक एक्‍स्प्रेस २० मिनिटे रोखली
मनमाडला तरुणांचा मोर्चा, निदर्शने, धरणे आणि रास्ता रोको
टाकळी-विंचूर, मनमाड-लासलगावमध्ये बसगाडीच्या फोडल्या काचा
नामपूरमध्ये संभाजी भिडेंचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत टायर जाळले
एसटी महामंडळातर्फे शहर वाहतूक व जिल्हाभरातील बसगाड्या उभ्या
अडीच हजार टॅक्‍सी-रिक्षा, ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या २५० बसगाड्या धावल्या नाही
नाशिकमध्ये २० टक्के भाजीपाला आला विक्रीला आणि भावात ३० टक्‍क्‍यांनी घसरण
कळवण- नांदुरी मार्गावर रास्ता रोको
नांदगावमध्ये भीमसैनिकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
मालेगावमध्ये तरुणांचा मोर्चा आणि घोषणाबाजीमुळे तणावाची स्थिती
कळवणमध्ये मोर्चा काढून बाजारपेठांमधील व्यवहार केले बंद
वणीत बंद आणि खासगी शाळांना सुटी
चांदवडमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुटी, वडनेरभैरवमध्ये निषेध मोर्चा
येवल्यात दंगल घडवणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
निफाड, पिंपळगाव बसवंत, सप्तशृंगगड, चांदवड, सटाणा, येवला, दिंडोरी, इगतपुरीत बंद
तीर्थक्षेत्रांमधील मंदिरे ओस
नाशिक रोड, रेल्वेस्थानक, भाजीबाजार भागात शुकशुकाट
उड्डाणपुलावरून वाहतूक सुरळीत, बायपासमार्गे मुंबईप्रमाणेच मालेगावची वाहतूक वळवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com