वाहतुकीच्या शिस्तीसाठी आता बेंगळुरू पॅटर्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

नाशिक - शहरात दिवसेंदिवस वाहतुकीचे प्रश्‍न जटिल होत आहेत. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वाहतूक नियमांच्या प्रशिक्षणाची आवश्‍यकता आहे. नाशिकमध्ये वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल होत असून, बेंगळुरूच्या धर्तीवर उपक्रम राबवून वाहतूक समस्या कमी करण्यात येणार आहे. 

नाशिक - शहरात दिवसेंदिवस वाहतुकीचे प्रश्‍न जटिल होत आहेत. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वाहतूक नियमांच्या प्रशिक्षणाची आवश्‍यकता आहे. नाशिकमध्ये वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल होत असून, बेंगळुरूच्या धर्तीवर उपक्रम राबवून वाहतूक समस्या कमी करण्यात येणार आहे. 

परिवहन विभागातर्फे १८ ते २५ वयोगटातील शिकाऊ परवाना (लायसन्स) धारकांना चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कमधून कोर्स करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरच पक्के लायसन्स मिळणार असल्याने पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण झाले. वाहतूक पोलिस, परिवहन विभाग व नाशिक फर्स्ट संस्थेकडून सुरू असलेल्या वाहतूकविषयक उपक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले. नव वाहनचालकांनी प्रशिक्षणापुरते अवलंबून न राहता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत संकल्पना पोचवून वाहतूक सक्षम करण्यास सांगितले. 

अपघाताचे प्रमाण शून्य टक्‍क्‍यांवर आणण्यासाठी प्रयत्न 
प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र कदम म्हणाले, की सुरक्षित वाहतुकीसाठी वाहनचालकांची वर्तणूक बदलणे गरजेचे आहे. न्यायाधीश राधाकृष्णन समितीच्या अहवालानुसार कमीत कमी दहा टक्के अपघात कमी करण्याच्या सूचना होत्या. नाशिकमध्ये २२ टक्के अपघातांमध्ये घट झाली आहे. अपघातांचे प्रमाण शून्य टक्‍क्‍यावर आणायचे आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर म्हणाले, की वाढत्या अपघातांवर उपाययोजना करण्यासाठी इंजिनिअरिंग सोल्युशन, स्ट्रीट एन्फोर्समेंट व वाहतूक एज्युकेशन यावर भर दिला जात आहे. शिकाऊ परवाना प्राप्त झाल्यानंतर काउन्सिलिंग करणे हा त्याचाच एक भाग आहे. हा देशातील पहिला प्रयोग ठरला आहे. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी रविवार व मंगळवार या दोन दिवशी बॅच राहतील. सुसंस्कृत वाहतूक व्यवस्था निर्माण करणे ही चळवळ झाली असून, त्यात नागरिकांनी उतरण्याचे आवाहन त्यांनी केले. सुरेश पटेल यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय देशमुख यांनी आभार मानले. या वेळी प्रसाद सानप, श्रावणी कडलग, अभिषेक वाणी, त्रिशा मजेठिया, सायली शिंदे यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रशिक्षण पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

पथक पाठवून माहिती घेणार
नाशिकमध्ये वाहतुकीचा बेंगळुरू पॅटर्न अमलात आणायचा आहे. जेणेकरून वाहतुकीचे अधिकाधिक नियम पाळणारे शहर म्हणून नाशिकचे नाव सर्वदूर पोचेल. शहरात वाहतुकीच्या दृष्टीने चार विभाग करण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येकी एका विभागाला एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक व शंभर कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त स्टाफ देण्यात आला आहे. बेंगळुरू येथे पोलिसांचे पथक पाठवून तेथील वाहतूकविषयक सुविधा नाशिकमध्ये अमलात आणल्या जाणार आहेत. 

Web Title: nashik news Bengaluru Pattern Now for Transportation Discipline