सरकारच्या कर्जमाफीकडील दुर्लक्षामुळे भालेराव यांची आत्महत्या : पगार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

येवला (नाशिक) : शेतकऱ्यांच्या आक्रमक आणि टोकाच्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याचे पाहूनच पाटोदा-येवला रस्त्यावरील पिंप्री येथील आंदोलनासह इतर आंदोलनात सहभाग घेतलेले तरुण शेतकरी नवनाथ भालेराव यांनी आत्महत्या केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पगार यांनी केला आहे.

पिंप्री येथील तरुण शेतकरी नवनाथ चांगदेव भालेराव (वय 28) यांनी वि. का. सोसायटी, बॅंक व व्यक्तीगत कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. भालेराव यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची पगार यांनी भेट घेतली. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र मोठ्या प्रमाणावर वाढत असून शेतकरी आत्महत्यांबबद्दल सरकार कुठल्याही प्रकारचे सोयरसुतक नाही.' शेतकऱ्यांच्या संपाने रौद्र रुप धारण केल्यानंतरही झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारचे डोळे उघडतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत असताना सरकार दोलायमान भूमिका घेत असल्याचे दिसल्याने भालेराव यांनी आत्महत्या केल्याचे पगार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटत चालल्याचे चित्र आहे. त्यमुळे सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास येत्या काळात आत्महत्या वाढण्याची शक्‍यता असल्याची भीती पगार यांनी व्यक्त केली.

यावेळी विधानसभा मतदारसंघ पक्षाचे अध्यक्ष वसंत पवार, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, छगन भुजबळ यांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर शेवाळे, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, अशोक मेंगाणे, भगवान ठोंबरे, साहेबराव आहेर, भिका कुदळ, नानासाहेब लोंढे, बाळासाहेब कोटकर, प्रभाकर बोरणारे, गणपत कांदळकर, प्रितम कुदळ आदी उपस्थित होते.

Web Title: nashik news bhalerao suicide farmer strike marathi news maharashtra news