पाखरांचा मित्र अमोलला 230 जातींच्या पक्ष्यांची ओळख 

आनंद बोरा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नाशिक - महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूर मधमेश्‍वर पक्षी अभयारण्यातील रंगीबेरंगी पक्ष्यांच्या सहवासात राहणारा अमोल दराडे हा पाखरांचा सच्चा मित्र बनला आहे. त्याला 230 जातीच्या पक्ष्यांची ओळख आहे. आज (ता. 19) सायंकाळी सहाला कुसुमाग्रज स्मारकात रोटरी क्‍लब ऑफ नाशिकतर्फे विशेष सेवाभावी पुरस्काराने अमोलचा सन्मान केला जाईल. 

नाशिक - महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूर मधमेश्‍वर पक्षी अभयारण्यातील रंगीबेरंगी पक्ष्यांच्या सहवासात राहणारा अमोल दराडे हा पाखरांचा सच्चा मित्र बनला आहे. त्याला 230 जातीच्या पक्ष्यांची ओळख आहे. आज (ता. 19) सायंकाळी सहाला कुसुमाग्रज स्मारकात रोटरी क्‍लब ऑफ नाशिकतर्फे विशेष सेवाभावी पुरस्काराने अमोलचा सन्मान केला जाईल. 

अमोलला पक्षी येतात कुठून, खातात काय, त्यांचे पर्यावरणातील महत्त्व याबद्दलची खडा न्‌ खडा माहिती आहे. जखमी पक्ष्यांसाठी धावून जाणाऱ्या अमोलने आतापर्यंत शेकडो पक्ष्यांना नवीन भरारी दिली. सात वर्षांपासून तो वनविभागाचा "गाइड' म्हणून काम करीत आहे. नांदूर मधमेश्‍वरला जाणारा प्रत्येक पर्यटक अमोलला भेटल्याशिवाय परतत नाही. नांदूर मधमेश्‍वरमध्ये स्थानिक आणि स्थलांतरित 240 पेक्षा जास्त जातीचे पक्षी पहायला मिळतात. शंभर चौरस किलोमीटर क्षेत्रात अभयारण्य आहे. या अभयारण्याची निवड जगप्रसिध्द रामसर यादीत होणार आहे. 1982 मध्ये ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. सलीम अली यांनी येथे भेट दिली होती. 

चापडगावजवळील धरणाच्या "बॅक वॉटर'ला लागून अमोलचे घर आणि शेती आहे. त्याला लहानपणापासूनच पाखरांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली. नाशिकचे अनेक पक्षीमित्र पक्षी निरीक्षणाला जात. त्यांचे कॅमेरे, दुर्बीण त्याला आकर्षित करायचे. पक्षीमित्र काय करतात, हे पाहत त्याला पक्ष्यांची ओळख होत गेली. त्याला पक्षी निरीक्षणाचे धडे श्री. तमाईचेकर आणि त्यांचे सहकारी गंगाधर आघाव यांनी दिले. 

अपंगत्वावर यशस्वी मात 
अमोल वयाच्या बारा वर्षापर्यंत धडधाकट होता. पक्षी निरीक्षणाबरोबर तो कुस्ती खेळायचा. तो नववीत असताना हात आणि पायामधील शक्ती क्षीण झाली. त्याला चालणे अवघड बनले. अनेक उपचार केले. पण काही उपयोग झाला नाही. तो हरला नाही. प्रचंड जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण म्हाळसाकोरे येथील आरूड विद्यालयात तर बी. ए.पर्यंतचे शिक्षण सायखेडा महाविद्यालयात पूर्ण केले. अमोल आजारामुळे व्यवस्थित चालू शकत नाही. पण तो पक्षीमित्रांना पक्ष्यांची माहिती देतो. 

Web Title: nashik news bird amol darade