भाजपअंतर्गत मतभेदांवरून पालकमंत्र्यांच्या कानपिचक्‍या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नाशिक - महापालिकेत भारतीय जनता पक्षाला शत-प्रतिशत यश मिळाल्यानंतर सत्तेचा गाडा व्यवस्थित चालण्याऐवजी पक्षांतर्गत मतभेद टोकाला पोचले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना कानपिचक्‍या देत मतदारांचा विश्‍वास सार्थ ठरविण्याचा सल्ला दिला. नगरसेवकांमधील खदखद पालकमंत्र्याच्या भाषणातून व्यक्त झाल्याने भाजपमधील एक गट अधिकच आनंदित झाल्याचे भाजप कार्यालयात दिसून आले. आजच्या बैठकीला बारा ते पंधरा नगरसेवकांनी दांडी मारल्याने नगरसेवकांच्या अभ्यासवर्गाची अनुपस्थिती खपवून घेतली जाणार नसल्याचा कडक इशाराही त्यांनी दिला. 

महापालिकेत भाजपला नाशिककरांनी 66 नगरसेवक निवडून देत बहुमतापलीकडे नेऊन ठेवले. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतिपदासह विषय समित्यांवर भाजपची सत्ता आली. भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाला पाच वर्षांत सत्तेच्या दोन-दोन पदांवर काम करता येईल इतके बहुमत मिळाले खरे; परंतु पक्षातील अंतर्गत कुरबुरीने काही दिवसांमध्ये डोके वर काढले आहे. महापालिकेत सत्तेवरील प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून स्वतंत्र सत्ताकेंद्र चालविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अधिकाऱ्यांना तासन्‌ तास पदाधिकाऱ्यांच्या दालनात बसवून ठेवले जात असल्याने प्रशासकीय पातळीवरसुद्धा नाराजी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या वसंत- स्मृती कार्यालयात नगरसेवकांच्या बैठकीत पालकमंत्री महाजन यांनी कानपिचक्‍या दिल्या. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले आहे. त्यांचा शब्द सार्थ ठरविण्यासाठी व पक्ष वाढविण्यासाठी नगरसेवकांनी एकोप्याने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. नगरसेवकांच्या तक्रारी असेल, तर थेट वरिष्ठांना भेटण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला. 

भाजपचा स्वबळाचा नारा 
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा एकदा नगरसेवकांना स्वबळाचा नारा दिला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती होती. देशभर मोदी नावाचा ब्रॅन्ड भाजपकडे उपलब्ध झाला, शिवाय तीन वर्षांत शिवसेनेविरुद्ध भाजपमधील अंतर्गत वाद शिगेला पोचला. सरकार पडेपर्यंत परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेशी युती करायची नाही, इथपर्यंत भाजपने भूमिका घेतली तर शिवसेनेनेसुद्धा शेतकरी मेळाव्यांमधून स्वतंत्र लढण्याची तयारी करत भाजपला जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरू केल्याने लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज नगरसेवकांच्या बैठकीत केले. बूथ बळकट करण्यापासून तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

Web Title: nashik news bjp corporator