भाजप नगरसेवक हेमंत शेट्टीचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

नाशिक - पंचवटीतील सराईत गुन्हेगार ज्वाल्या ऊर्फ जालिंदर अंबादास उगलमुगले याच्या खूनप्रकरणी गेले दीड महिना अटकेत असलेला भाजपचा नगरसेवक व गुन्हेगार हेमंत शेट्टी याचा जामीन अर्ज काल जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. 

नाशिक - पंचवटीतील सराईत गुन्हेगार ज्वाल्या ऊर्फ जालिंदर अंबादास उगलमुगले याच्या खूनप्रकरणी गेले दीड महिना अटकेत असलेला भाजपचा नगरसेवक व गुन्हेगार हेमंत शेट्टी याचा जामीन अर्ज काल जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. 

पंचवटीतील सराईत गुन्हेगार ज्वाल्या ऊर्फ जालिंदर उगलमुगले याला १ ऑक्‍टोबर २०१५ ला इगतपुरी परिसरात मद्य पाजून जिवंत जाळण्यात आले होते. या खुनाची उकल गेल्या मे महिन्यात झाली. याप्रकरणी सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, कुंदन परदेशी, अविनाश कौलकर, रोहित कडाळे, श्‍याम महाजन यांना अटक करण्यात आली. ज्वाल्याचा खून भाजपचा नगरसेवक व सराईत गुन्हेगार हेमंत शेट्टी याच्या सांगण्यावरून झाल्याचे तपासात उघड झाले होते. याप्रकरणी शेट्टी सध्या नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अर्ज  केला होता. 

या जामीन अर्जावर आज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली असता, सरकारी पक्षातर्फे ॲड. के. एन. निंबाळकर यांनी जोरदार युक्तिवाद करत विरोध केला. दीड वर्षापूर्वीच्या खुनाची उकल पोलिसांनी केली. शेट्टी हा सराईत गुन्हेगार असून, ज्वाल्याशी त्याचा वाद झाला होता. त्यामुळे शेट्टीच्याच इशाऱ्यावरून कोष्टी, परदेशी व साथीदारांनी त्याचा खून केल्याचे भक्कम पुरावे असल्याचे न्यायालयात सादर केले. पोलिसांना दीड वर्षानंतर या घटनेचे धागेदोरे एका आरोपीच्या अटकेतून मिळाले होते. त्याच्या चौकशीदरम्यान त्याने गुंड ज्वाल्या उगलमुगलेच्या हत्येची कबुली दिली होती. ही हत्या शेट्टीच्या सांगण्यावरून झाली. त्याआधारे न्यायालयाने हेमंत शेट्टीचा जामीन अर्ज फेटाळला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत खुनाचा गुन्हा  दाखल आहे.

Web Title: nashik news bjp corporator hemant shetty