तिबेटियन मार्केट स्फोटाने हादरले

नाशिक - शरणपूर रोडवरील तिबेटियन मार्केटमध्ये शनिवारी पहाटे झालेल्या स्फोटाची पाहणी करताना फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी.
नाशिक - शरणपूर रोडवरील तिबेटियन मार्केटमध्ये शनिवारी पहाटे झालेल्या स्फोटाची पाहणी करताना फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी.

नाशिक - शहरातील जुन्या पोलिस आयुक्तालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या तिबेटियन मार्केटमध्ये आज (ता. ७) पहाटे कर्कश आवाजाने स्फोट झाला. या स्फोटात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र आठ दुकानांसह वाहनांचे नुकसान झाले. या स्फोटासंदर्भात तर्कवितर्क लावत असताना पाच तासांनंतर हा स्फोट गॅसगळतीतून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पहाटेच्या सुमारास स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

शहरातील मध्यवर्ती परिसरात असलेल्या महापालिकेच्या तिबेटियन मार्केटमध्ये पहाटे पाचच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यामुळे तिबेटियन परिसरातील दुकाने आणि येथे असलेल्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक इमारतींना मोठा हादरा बसला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या. पहाटेच्या नीरव शांततेत अचानकच झालेल्या शक्तिशाली स्फोटाच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. मोठ्या आवाजामुळे नागरिकही घाबरून गेले.

तिबेटियन मार्केट परिसरात स्फोट झाला असल्याची घटना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. या वेळी नेमका हा स्फोट सिलिंडरचा झाला की आणखी कशामुळे, याचा अंदाज लावणे पोलिसांना जमत नव्हते. पाच दिवसांपूर्वीच शहरातील पाथर्डी परिसरात पोलिसांना १७ डिटोनेटर्स आणि जिलेटिनच्या ६० कांड्या सापडल्या होत्या. त्यामुळे हा घातपाताचा तर प्रकार नाही ना, अशी शंका आल्याने त्या दिशेने शोध घेण्यास पोलिसांनी सुरवात केली. याचदरम्यान पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, बाँबशोधक-नाशक पथक, दहशतवादविरोधी पथक आणि रासायनिक विश्‍लेषक पथकाचे अधिकारी यांनी घटनास्थळी पोचून तपासास सुरवात केली. एकेक संशयास्पद वस्तू गोळा करण्यास सुरवात केली. दुकानातील सर्व वस्तू बाहेर काढल्या. याच वेळी या दुकानांमधून आठ गॅस सिलिंडर चांगल्या स्थितीत मिळाल्याने हा गॅस सिलिंडरचा स्फोट नसल्याने पोलिसांनी सांगितल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरवात झाली.

दाब तयार होऊन घर्षण 
पहाटे सव्वापाचला तिबेटियन मार्केटमध्ये झालेला स्फोट हा सिलिंडरचा नसून गॅस सिलिंडर टाकीच्या नळीमधून गॅसची गळती होऊन हा गॅस दुकानात साचून त्याचा दाब तयार झाला. या ठिकाणी भीषण असा स्फोट झाल्याचे घटनास्थळावरून रासायनिक विश्‍लेषक पथकातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती आणि उपलब्ध पुरावे यावरून प्राथमिक अंदाज काढला. 

पहाटे तिबेटियन मार्केटमध्ये झालेला स्फोट हा घातपाताचा प्रकार नाही. गॅसगळतीतून हा स्फोट झाला आहे. यात आठ दुकानांसह परिसरातील वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून पुराव्याच्या दृष्टीने काही संशयास्पद वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सर्व कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सर्व अंगांनी तपास करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वांना दिले आहेत. 
- डॉ. राजू भुजबळ, सहाय्यक पोलिस आयुक्त, नाशिक

तिबेटियन मार्केट ठरतेय गुन्हेगारांचा अड्डा? 
आज पहाटेच्या सुमारास तिबेटियन मार्केट परिसरात गॅसगळतीतून झालेल्या स्फोटामुळे तिबेटियन मार्केट प्रकाशझोतात आले आहे. गेल्या काही घटनांमुळे शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील सराईत गुन्हेगारांचा अड्डा म्हणून तिबेटियन मार्केटची ओळख बनली आहे. जुन्या पोलिस आयुक्तालयापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर असलेल्या या मार्केटचा इतिहास गेल्या काही घटनांमुळे गुन्हेगारी स्वरूपाचा बनला आहे. याच मार्केटमध्ये एकदा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा पोलिसांना मिळून आला होता. या ठिकाणी काही सराईत गुन्हेगारांवर ठार करण्याचा प्रयत्न आणि खुनासारखी घटनादेखील घडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com