आंदोलनाने शहर बससेवा कोलमडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

प्रवाशांचे हाल; पंचवटी आगारात बसफेऱ्या कमी केल्याच्या निषेधार्थ ‘कामबंद’

नाशिक - नादुरुस्त बसगाड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर फेऱ्या कमी केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २२) पंचवटीतील आगार क्रमांक एकमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडल्याने आज येथून एकही बसगाडी बाहेर पडू शकली नाही. त्यामुळे शहरातील विविध भागांतील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

प्रवाशांचे हाल; पंचवटी आगारात बसफेऱ्या कमी केल्याच्या निषेधार्थ ‘कामबंद’

नाशिक - नादुरुस्त बसगाड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर फेऱ्या कमी केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २२) पंचवटीतील आगार क्रमांक एकमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडल्याने आज येथून एकही बसगाडी बाहेर पडू शकली नाही. त्यामुळे शहरातील विविध भागांतील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

पंचवटीतील जुन्या आडगाव नाक्‍याजवळ परिवहन महामंडळाचा डेपो क्रमांक एक आहे. येथून शहराच्या विविध भागांत रोज अंदाजे १७० बस सुटतात. काही दिवसांपासून स्पेअरपार्ट मिळत नसल्याने अनेक बस बंद अवस्थेत असल्याचा वाहनचालकांचा दावा आहे. त्यामुळे सध्या येथून १३० च्या आसपास बस सुटतात. रोज चाळीस वाहन व चालक ड्यूटीवर येतात. त्या तुलनेत बस उपलब्ध होत नसल्याने या कर्मचाऱ्यांना चक्क बसून राहावे लागते. फेऱ्याच नसल्याने त्यांना त्याचे वेतनही मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आज दुपारनंतर अचानक आंदोलन छेडले. दुपारनंतर एकही बस या डेपोतून बाहेर पडू शकली नाही. शहरातील सिडको, सातपूर, नाशिक रोड, मातोरी, आडगाव, महिरावणी, ओझर, नांदूर नाका भागातील प्रवाशांचे विशेषतः विद्यार्थ्यांचे हाल झाले.

...अन्‌ झाला कर्मचाऱ्यांचा उद्रेक
तोटा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाचे ग्रामीण भागातील तसेच तोट्यातील बसफेऱ्या बंद करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मध्यंतरी गिरणारेसह काही भागांतील बससेवा बंद करण्यात आल्यावर मोठा जनक्षोभ उसळला होता. महामंडळाच्या ताफ्यातील बसपैकी अनेक बस नादुरुस्त आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या दुरुस्तीसाठी स्पेअरपार्ट उपलब्ध करून दिले जात नसल्याचा कामगारांचा आरोप आहे. मात्र याचे खापर कर्मचाऱ्यांवर फोडण्यात येत असल्याचा त्यांचा दावा आहे. आडगाव नाक्‍यावरील डेपोमधील सुविधांबाबतही कर्मचाऱ्यांचा रोष आहे. त्यातच अनेक बसही बंद पडल्याने त्याची झळ कर्मचाऱ्यांना बसू लागली. त्याचा आज उद्रेक होऊन कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर कामबंद आंदोलन सुरू केले. 
 

महामंडळाच्या अनेक बस नादुरुस्त आहेत. त्यामुळे ड्यूटीवर आलेल्या कर्मचाऱ्यांना बस उपलब्ध होत नाहीत. त्यांना विनापगार बसून राहावे लागते. त्याचा आज स्फोट होऊन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले.
- एक कर्मचारी, राज्य परिवहन महामंडळ

कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने दुपारनंतर बस बंद झाल्याने चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचेही हाल झाले. महामंडळाने जनतेला चांगली व दर्जेदार सेवा देणे गरजेचे आहे.
- हर्षल पवार, विद्यार्थी

Web Title: nashik news bus service colapse by agitation