"सीईटी' अर्जासाठी रविवारपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

नाशिक - राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा कक्षा (स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल)च्या माध्यमातून येत्या 10 मे रोजी विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी "एमएचटी- सीईटी 2018' घेतली जाणार आहे. या परीक्षेचा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत रविवार (ता. 25) पर्यंत असून, विलंब शुल्कासह 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करता येईल. अभियांत्रिकीसह औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमांना या "सीईटी'द्वारे प्रवेश निश्‍चित करता येणार आहेत. इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकीसह बी.फार्म., बी.टेक., बी.एस्सी. (कृषी) आदी अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

"जेईई मेन्स' 8 एप्रिलला, "नीट' 6 मेस
आयआयटी, एनआयटी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या जेईई मेन्स परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. या परीक्षेचा ऑफलाइन लेखी पेपर 8 एप्रिलला देशभरातील केंद्रांवर होणार आहे. ऑनलाइन स्वरूपातील परीक्षा 15 व 16 एप्रिलला पार पडेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डातर्फे आयोजित या परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. पात्रता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा 20 मे रोजी होईल. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी "नीट'-2018 करिता अर्जाची मुदत संपली आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 6 मे रोजी घेतली जाईल.

Web Title: nashik news cet form

टॅग्स