सोनसाखळीचोरांचा धुमाकूळ

सोनसाखळीचोरांचा धुमाकूळ

चाळीस मिनिटांत चार, तर दीड तासात सहा घटना; पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’

नाशिक - गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पाऊण तासांमध्ये तीन सोनसाखळ्या खेचून नेल्याच्या गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नसताना, आज गंगापूर रोड परिसरात अवघ्या ४० मिनिटांत चार, तर पंचवटी व भद्रकाली परिसरात एकेक अशा सहा सोनसाखळ्या अवघ्या दीड तासात लांबविल्याच्या घटना घडल्या. सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा देखावा करून गुन्हा दाखल केले. 

आज सकाळी सव्वासातच्या सुमारास काठे गल्लीमध्ये पहिली सोनसाखळी चोरी झाली. भद्रकाली पोलिसांत शंकुतला आर. पाटील (वय ५३, रा. गणेशनगर, काठे गल्ली) यांच्या फिर्यादीनुसार, सकाळी सव्वासातच्या सुमारास तपोवन रोडवरील त्रिकोणी गार्डन परिसरात जैन स्थानक रस्त्याने देवपूजेसाठी फुले तोडत असलेल्या शंकुतला पाटील यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्यांचे ३५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीवरून चोरटे पसार झाले. 

कॉलेज रोडच्या बिग बझार ते गंगापूर रोडवरील मर्चंट बॅंकेदरम्यान काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन सोनसाखळी चोरट्यांनी सकाळी पावणेआठ ते साडेआठ या ४० ते ४५ मिनिटांदरम्यान चार सोनसाखळ्या लांबविल्या. चंदा पुखराज जैन (वय ५९, रा. पंपिंग स्टेशन, गंगापूर रोड) आज सकाळी एका स्विट्‌सच्या दुकानासमोरून जात होत्या. त्या वेळी चोरट्यांनी जैन यांच्या गळ्यातील ३६ हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडले. घटनास्थळी गंगापूर पोलिस माहिती घेत असतानाच चोरट्यांनी काही अंतरावरच मालती रामचंद्र कुलदेवरे यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने गंगापूर रोड परिसरात पादचारी महिला उषा हरिभाऊ थेटे यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे ३६ हजार रुपयांचे मंगळसूत्र आणि पुष्पा श्रीकृष्ण कुलकर्णी यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाचे २० हजार रुपयांचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. 

रेल्वेत मंगळसूत्र लांबविणाऱ्या दोन अल्पवयीन मुली ताब्यात
देवळालीगाव - नाशिक रोड रेल्वेस्थानकातून काशी एक्‍स्प्रेसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून अडीच ग्रॅम सोन्याच्या मंगळसुत्राची वाटी व मुद्देमाल आढळला. 

फिर्यादीच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी (ता.१४) सकाळी अकरा वाजेदरम्यान फलाट क्रमांक दोनवर भुसावळकडे जाणारी गाडी (१५०१७) दादर-गोरखपूर काशी एक्‍स्प्रेसच्या इंजिनपासून दुसऱ्या जनरल बोगीमध्ये फिर्यादी महिला चढत होती. दोन अल्पवयीन मुलींनी फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पळ काढला. फिर्यादीने आरडाओरडा केल्याने डयुटीवरील पोलिसांनी पाठलाग करून त्या दोघींना ताब्यात घेतले. दोन्ही बालिकांची नाशिक रोड लोहमार्ग पोलिस ठाण्यात झडती घेतली असता त्यांच्याजवळ चोरीला गेलेला मुद्देमाल आढळला. फिर्यादीच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना उंटवाडी येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आले.

गंगापूर रोड मुख्य लक्ष्य 
चारही घटना अवघ्या ४० मिनिटांत घडल्याने गंगापूर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. पंचवटीतील टकलेनगर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने ओरबाडून नेली. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

पथके रवाना
अवघ्या दीड तासामध्ये सहा सोनसाखळी चोरीच्या घटनेने महिलांची सुरक्षितताच धोक्‍यात आली आहे. त्यामुळे हादरलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नाकाबंदी केल्यानंतरही चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. त्यामुळे गुन्हे शाखा व पोलिस ठाण्याचे संयुक्त पथके तयार करून मुंबई, कल्याण, नगर, ठाण्याकडे रवाना करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com