काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून ‘घरकुल’च्या नावाखाली फसवणूक

नांदूर - पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवून देण्याचे अामिष दाखवत ग्रामीण भागातील महिलांकडून पैसे उकळणाऱ्या संशयिताची महिलांसमोर कानउघाडणी करताना नगरसेवक उद्धव निमसे.
नांदूर - पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवून देण्याचे अामिष दाखवत ग्रामीण भागातील महिलांकडून पैसे उकळणाऱ्या संशयिताची महिलांसमोर कानउघाडणी करताना नगरसेवक उद्धव निमसे.

बनसोडे, गायकवाडांवर गुन्हे; नगरसेवक निमसेंकडून भांडाफोड

पंचवटी - पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली ग्रामीण महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करत असल्याचे नगरसेवक उद्धव निमसे यांना कळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणत संशयिताच्या कामाचा भांडाफोड केला. श्री. निमसे यांच्या तक्रारीनंतर आडगाव पोलिस ठाण्यात संशयित शालिग्राम बनसोडे यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल झाला.

काँग्रेसचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष शालिग्राम बनसोडे व महिलाध्यक्षा मंदाकिनी गायकवाड यांनी नांदूरगावासमोर महापालिकेच्या जागेवरील एका भाड्याच्या गाळ्यात कार्यालय सुरू केले. गरीब महिलांना हक्काच्या घराचे आमिष दाखवून २०० ते ३०० रुपये आकारत बनावट अर्ज भरून घेण्यास सुरवात केली. ‘सकाळ’च्या कार्यक्रमांतर्गत श्री. निमसे नांदूरगावात आले होते. त्यांना काही कार्यकर्त्यांनी घरकुल योजनेच्या नावाखाली एक कार्यकर्ता महिलांकडून तीनशे रुपये गोळा करत असल्याची माहिती दिली.

त्यानंतर श्री. निमसे यांनी तातडीने संबंधित कार्यालय गाठत घरकुल योजनेसंदर्भात माहिती घेतली. दोघांच्या भूलथापांना बळी पडून कारसूळ, अहिवंतवाडी, वडाळी, वणी या भागातून आलेल्या महिला जमल्या होत्या. निमसे यांनी संबंधितांना याचा जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मंदाकिनी गायकवाड यांना महिलांकडून तीनशे रुपये कशाचे घेता, अशी विचारणा केली असता दोनशे रुपये अर्जाचे व शंभर रुपये फायटिंग फंडांचे असल्याचे सांगितले. श्री. निमसे यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकाराबद्दल माहिती दिली. तसेच आडगाव पोलिसांशी संपर्क साधून संबंधित प्रकाराविषयी माहिती दिली. काही वेळातच आडगावचे पोलिस उपनिरीक्षक माळी दाखल होत शालिग्राम बनसोडे याला ताब्यात घेत आडगाव पोलिस ठाण्यात नेले. फसवणूक झालेल्या महिलाही पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. पोलिस ठाण्याच्या आवारात ‘आम्हाला आमचे पैसे भाड्यासह परत मिळावेत,’ अशी मागणी या महिलांनी सुरू केली. यानंतर श्री. निमसे यांनी या महिलांसह आडगाव पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 

काँग्रेसचा कानावर हात
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे व शहराध्यक्ष शरद आहेर यांच्याशी संपर्क साधून संबंधित प्रकाराविषयी विचारले असता,  बनसोडे व गायकवाड यांचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधितांकडून असे उद्योग वारंवार होत असल्याचा व घरकुल योजनेचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

अतिक्रमणाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर
संबंधित कार्यालय ज्या जागेवर थाटले आहे, ती जागा महापालिकेच्या मालकीची असून, तेथे चक्क तीन दुकाने थाटल्याचे निदर्शनास आले. श्री. निमसे यांनी तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत अतिक्रमणविरोधी पथकाला त्या ठिकाणी बोलावून घेतले. महापालिकेच्या जागांवर अतिक्रमणे उभी राहतातच कशी, असा सवाल श्री. निमसे यांनी उपस्थित केला. संबंधित ठिकाणी बांधकाम विभागासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com