तत्कालीन राज्यकर्त्यांकडून सावरकरांवर अन्याय - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

नाशिक - आधी ब्रिटिशांनी आणि स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अन्याय केला. अंदमान कारागृहातील सावरकरांच्या नावाची पाटी काढण्याचे काम नालायक मंत्र्याने केले. सावरकरांचा अपमान करणारे हे देशात मंत्री झाले. विषमताविरहित समाज आणि देशभक्ती जागरूक ठेवणे हीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त भगूरला झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सावरकर स्मारकात प्रतिमापूजन व अभिवादन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, की भारताला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सावरकरांनी त्यांचे जीवन मातृभूमीला अर्पण केले. ते व्यक्ती नव्हे तर संस्था आणि क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत होते. त्यांनी क्रांतिकारकांची पिढी निर्माण केली. अपमान, अन्याय सहन करूनही देशसेवेचा विचार कधीच ढळू दिला नाही. सशस्त्र क्रांती चळवळ दडपण्यासाठी अनेकदा इंग्रजांनी सावरकरांचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला; पण परिस्थितीला शरण न जाता त्यांनी तरुण पिढीत देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. हे त्यांच्या जीवनातील मोठेपण होते.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी जतन करण्यासाठी संग्रहालय उभारावे, अशी मागणी केली.

मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय
तेजस्विता, तपस्विता आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर लक्षावधी क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत होते. बारा वर्षांपेक्षा अधिक काळ अंदमानच्या शिक्षेची तमा न बाळगता प्रखर तेजाने इंग्रजी साम्राज्याविरोधातील मशाल तेवत ठेवणारे देशभक्त, कवी, समाजसुधारक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या भारतमातेच्या तेजस्वी सुपुत्राच्या घराचे दर्शन मंदिराच्या दर्शनापेक्षा जास्त पवित्र आहे, असा अभिप्राय मुख्यमंत्र्यांनी नोंदविला. जन्मोत्सव स्वागत समितीतर्फे लाड यांनी प्रास्ताविक केले. भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर यांनी स्वागत केले.

Web Title: nashik news chief minister talking