शहर बससेवा सुरू करण्याचे महापालिकेचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नाशिक - शहर बससेवा महापालिकेने चालवावी की नाही यावर निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. सल्लागार संस्थेने तीन महिन्यांत महापालिकेला अहवाल दिल्यानंतर बससेवेबाबतचा निर्णय घेणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आज जाहीर केले. त्यामुळे शहर बसगाड्यांच्या फेऱ्या कमी करून सेवाच बंद करण्याचा घाट घालणाऱ्या परिवहन महामंडळाला दिलासा मिळाला आहे. 

महिनाभरापासून शहर बससेवेबाबत अनिश्‍चितता असलेल्या नाशिककरांचाही जीव भांड्यात पडला आहे. शहरात राज्य परिवहन महामंडळातर्फे बसगाड्या चालविल्या जातात. पण गेल्या काही महिन्यांत तोट्याचे कारण देत बससेवा गुंडाळण्याचे प्रयत्न एसटी महामंडळाकडून होत आहेत. जूनमध्ये महापालिकेत भेटीवर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओला किंवा उबेर या खासगी संस्थांचा पर्याय निवडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तर एसटी बंद पाडण्याच्या प्रयत्नांना अधिक गती मिळाली. शहरातील प्रमुख मार्गांवरील फेऱ्या कमी करण्यात आल्या. बहुतांश मुख्य मार्गांवरील सेवा बंद करण्यात आल्याने नाशिककरांना खासगी वाहनाने प्रवास करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सेवा बंद पाडण्यासाठी विद्यार्थी, प्रवाशांशी अरेरावीचे प्रकारही घडल्याचे आडगाव येथील घटनेवरून स्पष्ट झाले.

दोन दिवसांपूर्वी एसटीच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी यंदाच्या आर्थिक वर्षापर्यंतच एसटीतर्फे शहर बससेवा सुरू राहणार असल्याचे जाहीर करून आगीत तेल ओतण्याचे काम केले. एसटीकडून सेवा बंद करण्याचे जाहीर केले जात असतानाच सार्वजनिक वाहतूक सेवेच्या भवितव्यावर चिंता व्यक्त होत आहे. आयुक्त कृष्णा यांनी आज बससेवा महापालिकेने सुरू करायची की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

शहर बससेवा सुरू करायची की नाही एवढ्यापुरते सल्लागार संस्थेचे काम मर्यादित राहणार नसून, सेवा सुरू करायची तर कुठल्या पद्धतीने करायची?, पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशिप, भाडेतत्त्वावर, की ‘एसटी’कडून सेवा ताब्यात घ्यायची, याचाही सल्ला कंपनीमार्फत घेतला जाणार आहे.
- अभिषेक कृष्णा, आयुक्त, नाशिक महापालिका

Web Title: nashik news city bus service