शहर बससेवा बंद पाडण्याचाच डाव

शहर बससेवा बंद पाडण्याचाच डाव

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नादुरुस्त बसगाड्यांची संख्या अधिक असल्याने त्या उभ्या आहेत. आमच्या हाताला काम नाही, नियमित कामावर येऊन काम न करता तसेच बसावे लागते, ही कारणे देत काल (ता. २२) कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे महापालिकेने बससेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यादृष्टीने शहरात सध्या सर्वेक्षण सुरू आहे. असे असताना महापालिकेची ही मोहीम हाणून पाडण्यासाठी, की खासगी सेवेला प्राधान्य देण्यासाठी हा संप झाला, या कारणास्तव परिवहन विभागाचा संप आता संशयाच्या कचाट्यात सापडला आहे. एसटी विभाग व महापालिका दोघांच्या भूमिकेवर हा प्रकाशझोत...

अचानक आंदोलनामुळे ‘परिवहन’वरच संशयाची सुई

नाशिक - शहर बस वाहतूक शाखेकडे सध्या अस्तित्वात असलेल्या बहुतांश बसगाड्या नादुरुस्त आहेत. हेच कारण पुढे करत  काल (ता. २२) अचानक संप पुकारण्यात आला. हे वरवरचे कारण दिसत असले, तरी शहर बससेवा बंद करण्यासाठी प्रवाशांची मानसिकता तयार करण्याचे षडयंत्र असल्याचा भाग मानला जात आहे. 

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असला, तरी सध्या परिवहन महामंडळातर्फे सुरू असलेली सेवा नाशिककरांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे मंगळवारी एसटी चालकांनी संप पुकारून सेवा बंद करणे नाशिककरांसाठी मोठी घटना ठरली. नाशिककरांमध्ये या घटनेने संतापाची लाट उसळली. ‘एसटी’च्या विविध संघटनांनी नादुरुस्त बससेवेचे कारण दिले, पण यात किती तथ्य आहे, हा संशोधनाचा विषय आहे.

एसटीकडे अडीचशेहून अधिक बस आहेत. त्यांपैकी पन्नासहून अधिक बसगाड्या नादुरुस्त आहेत. यात नवीन असे काहीच नाही. त्यामुळे नेमके आताच संप करण्याचा मुद्दा आला कोठून?, यावर विविध तर्क लावले जात आहेत. मुळात एसटीला शहर बस वाहतूक चालवायची नाही, हे प्रमुख कारण आहे. एसटीच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी यापूर्वी तसे जाहीर केले आहे. एसटीला ग्रामीण भागात सेवा देण्यात रस असल्याचे त्यांनी मेळा बसस्थानक पुनर्निर्माण कार्यक्रमापूर्वी तसे घोषित केले होते.      

एसटीला दोन कोटींचा मासिक तोटा असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नाशिक शहरात एसटी फायद्यात असल्याचे एसटीचेच माजी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर बससेवा सुरू करण्याचा रेटा वाढला होता. ‘बीआरटीएस’च्या अधिकाऱ्यांच्या महापालिकेत फेऱ्याही वाढल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका मुख्यालयात भेट दिली. त्या वेळी ‘ओला’ किंवा ‘उबेर’प्रमाणे सेवा सुरू करण्याचा सल्ला दिला होता. मेळा बसस्थानकाच्या उद्‌घाटनावेळी शहर बससेवा सुरू करण्याची चर्चा घडवून आणली जात होती. १ मेपासून शहर बससेवेच्या काही फेऱ्या बंद करण्यात आल्या. याप्रमाणे एसटी बंद करण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत. 

महामंडळाला थेट सेवा बंद करता येत नसल्याने कधी संप, कधी फेऱ्या घटविणे अशी विविध कारणे देऊन नाशिककरांनी स्वतःहूनच बससेवा नाकारावी, असे नियोजन करण्यात एक लॉबी गुंतल्याचे बोलले जात आहे.

शहर बसफेऱ्यांवर आणखी गंडांतर; जुलैमध्ये जवळपास दोन कोटींचा तोटा

नाशिक - तोटा होत असलेल्या मार्गांवरील बसफेऱ्या बंद करण्याचे धोरण राज्य परिवहन महामंडळाने सिटी बसबाबत काही महिन्यांपूर्वीच घेतले आहे. यामुळे विस्तारणाऱ्या शहरात विविध भागांतील दळणवळणाची सुविधा ठप्प झाली आहे. दोनशेहून अधिक सिटीबस असताना सध्या १७१ बस रस्त्यावर धावत आहेत. सध्या रोज तीन हजार ७२ बसफेऱ्या होत असल्याचे सांगितले जात आहे. जुलैमध्ये एक कोटी ९३ लाख तोटा झाल्याची नोंद आहे. त्यानुसार आणखी फेऱ्या कमी होण्याची शक्‍यता आहे. 

यापूर्वीच शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या बसफेऱ्या तोट्यामुळे बंद केल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी सिटी बसने प्रवास करतात. मात्र, पासच्या माध्यमातून फार काही उत्पन्न मिळत नाही.

महामंडळाकडून ‘त्या’ बसगाड्यांचा आग्रह का?
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत महामंडळाला बसगाड्या मिळाल्या आहेत. बसगाड्यांचे सुटे भाग कोठेच मिळत नसल्याने गाड्यांच्या देखभाल- दुरुस्तीत अनेक अडचणी येत आहेत. यामुळे गाड्या खिळखिळ्या झाल्या असून, तोट्यात भर घालण्यास कारणीभूत ठरत आहेत. दुसरीकडे फेऱ्या बंद केल्यानंतर उभ्या केल्या जात असलेल्या गाड्या महामंडळाच्या बांधणीच्या आहेत. 

सिटी बस फेऱ्यांमध्ये केलेल्या बदलामुळे एसटी कर्मचाऱ्यांचेही नुकसान होत आहे. करारानुसार कामगारांना प्रशासनाने हजर करून घेत त्या दिवसाचा पगार दिला पाहिजे. फेरी रद्द झाल्याने काही वाहन- चालकांना सक्‍तीने रजा घ्यावी लागत आहे. कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, याची काळजी घेतली जावी.
- विजय पवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना

महापालिका तपासणार बससेवेची व्यवहार्यता

नाशिक - एकीकडे राज्य परिवहन महामंडळाकडून शहर बससेवा बंद पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे, महापालिकेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची व्यवहार्यता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाहतुकीची घनता, फायदेशीर मार्ग व पर्यायी व्यवस्था याबाबतचा अहवाल घेण्यात येणार आहे.  

राज्यातील इतर महापालिकांप्रमाणे नाशिकमध्येही महापालिकेने शहर बससेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची असली, तरी महापालिकेला सेवा पुरविणे शक्‍य नाही. त्यामुळे १९९२ मध्ये शहर बससेवा सुरू करण्याचा सादर केलेला प्रस्ताव रद्द करण्यात आला.  पुन्हा २००७ मध्ये बससेवेच्या विषयाला हवा घालण्यात आली. महापालिकेने राज्य परिवहन महामंडळाला ना हरकत दाखला दिल्यानंतर जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत शंभर बसगाड्या परिवहन विभागाला मिळाल्या. त्यानंतर एसटी सेवा महापालिकेतर्फे सुरू करण्याचा विषय मागे पडला.

२०१२ मध्ये बीआरटीएस सेवा सुरू करण्यास नाशिकमध्ये वाव असल्याचे वातावरण तयार झाले. त्यासाठी अहमदाबाद, पुण्याचा दौरा करण्यात आला. पण बीआरटीएस सेवा महापालिकेला फायदेशीर नसल्याची टीका झाल्यानंतर तो विषय पुन्हा मागे पडला.

माहिती मिळविण्यासाठी आठ दिवसांत निविदा
एसटीने महापालिकेला काही महिन्यांपूर्वी पत्र देत सेवा सुरू करावी, अन्यथा तोट्यातील वाटा उचलावा, अशी सूचना केली. पण महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. दुसरीकडे, महापालिकेने वाहतुकीचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २५ लाख रुपये खर्च होणार असून, शहर बससेवेला पर्याय काय, कुठल्या मार्गावर बससेवा फायदेशीर राहील, रहदारीचे मार्ग किती आदींबाबत माहिती तपासली जाणार आहे. येत्या आठ दिवसांत संस्थेला काम देण्यासाठी निविदाप्रक्रिया राबवली जाणार आहे.

योगायोग तर नव्हे?
वाहतूक व्यवस्थेची व्यवहार्यता तपासण्याची योजना व ‘एसटी’च्या सेवेबाबत काही महिन्यांपासून नकारात्मक वातावरण निर्माण केले जात आहे. हा योगायोग समजावा, की एका यंत्रणेकडून दुसऱ्याकडे सेवेचे होणारे हस्तांतराबाबत सध्या विविध चर्चा शहरात सुरू आहे.

आकडेवारीत शहर बससेवा

२०० - एकूण बस संख्या

१७१ -  रस्त्यावर बसगाड्या

३०७२ - दररोज बसफेऱ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com