चैतन्य स्तूपाच्या छायेत शीतल कलाविष्कार..!

चैतन्य स्तूपाच्या छायेत शीतल कलाविष्कार..!

नाशिक - भारतीयांना समतेचा अधिकार मिळवून दिल्याबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करतानाच संविधान दिनानिमित्त शाळकरी कलाकारांपासून तर व्यावसायिक कलावंतांनी आपल्या कलांतून अभिवादन केले. कुणी कविता, कुणी नृत्य, तर कुणी गायनातून कलेचे सादरीकरण केले. डोळ्यांचे पारणे फेडणारा नृत्याविष्कार, प्रबोधन करणारी गाणी, मनाला नवविचारांची संजीवनी देणारे नाट्य असा विविध कलांचा आविष्कार कलाप्रेमींनी अनुभवला. चित्रकारांनी चैतन्य स्तूपाच्या चित्रासह शालेय परिसर कॅनव्हासवर सुबकपणे रेखाटला. संविधान दिनाचे औचित्य साधत जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील रमाबाई आंबेडकर विद्यालय येथे झालेल्या ‘सकाळ कलांगण’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली’, ‘सबसे प्यारा, संविधान हमारा’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी शालेय परिसर दुमदुमला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्र संचालित रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष करुणासागर पगारे, सरचिटणीस हेमंत वाघ, संचालक प्रा. गंगाधर अहिरे, अशोक मोरे, नितीन भुजबळ, शालेय समिती अध्यक्ष संचालक डॉ. संजय जाधव, मुख्याध्यापिका सरिता जोशी, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी माधुरी जाधव यांनी संविधान वाचन करत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यार्थिनींनी साकारलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन, स्तूपाचे पूजन, तसेच बुद्धवंदना, सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची रंगत वाढविली होती.

एकीकडे शाळकरी मुलांपासून तर नामवंत कलावंतांकडून कला सादरीकरण सुरू असताना दुसरीकडे चित्रकारांनी शालेय प्रांगणात ठाण मांडत कॅनव्हासवर सुबक अशा चित्रकृती साकारल्या. अनेक चित्रकारांना शालेय परिसरातील चैतन्य स्तूपाचे चित्र रेखाटण्याचा मोह आवरता आला नाही. काही चित्रकारांनी भगवान गौतम बुद्धांची, तर काहींनी शाळेची वास्तू रंग-रेषांनी कागदावर आणली होती. या वेळी प्रा. गंगाधर अहिरे, मधुकर बागूल यांनी कविता सादर केली. 

जिल्हा कोषागार अधिकारी विलास गांगुर्डे, अपर कोषागार अधिकारी अनिल गांगुर्डे, तर कलावंतांमधून क. का. वाघ ललित कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता बाळ नगरकर, व्यंग्यचित्रकार ज्ञानेश बेलेकर, प्रा. दीपक वर्मा, शिल्पकार सुरेश भोईर, सुलेखनकार नंदू गवांदे, चित्रकार अतुल भालेराव, संजय वाघ, रमेश जाधव, प्राचार्य मुंजा नरवाडे, दत्ता मुळे, श्‍याम दशपुत्रे, नंदकुमार खाडे, प्रमिला भामरे, नारायण चुंभळे, पंकज गवळी, प्रवीण सरागे, राहुल कहांडळ यांच्यासह आदिवासी शिक्षक संघटनेचे हरिश्‍चंद्र भोये, कास्ट्राईब महासंघाचे कार्याध्यक्ष रमेश जगताप, राजू रायमले, राजेंद्र निकम, अशोक मोरे, महेश अहिरे, मंदाकिनी दाणी, शशिकांत दाणी, सनी दाणी, तक्षशीला विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. डी. चव्हाण, कुणाल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अहिरे उपस्थित होते.

मिमिक्री अन्‌ प्रबोधनात्मक नाट्याचे सादरीकरण
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या ललित कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही ‘सकाळ कलांगण’च्या व्यासपीठावरून कला सादर केल्या. मिमिक्री करताना ज्ञानेश्‍वर रोकडे व शुभम यादव यांनी कधी मकरंद अनासपुरे, तर कधी नाना पाटेकर, अमिताभ बच्चन अन्‌ थेट निळू फुलेंचा आवाज काढत उपस्थितांचे निखळ मनोरंजन केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर करत प्रबोधन केले. ‘जात का?’ या विषयावर सादर झालेल्या नाट्यात ज्ञानेश्‍वर रोकडे, शुभम यादव, पंकज भाबड, महेश संगमनेरे, लखन जाधव, हर्षाली शिंदे, रविना खोडे, दीपाली जाधव, चैताली जाधव यांनी सहभाग नोंदविला.

आंबेडकरी शायरी जलशाचे सादरीकरण
लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या कलापथकाने या वेळी आंबेडकरी शायरी जलशाचे सादरीकरण केले. ‘जलसा’कार शरद शेजवळ यांच्यासह कलावंतांनी या वेळी गायिलेल्या गीतांतून उपस्थितांचे प्रबोधन केले. ‘शांतिदूताच्या वैभवशाली’ या वंदनगीताने सादरीकरणाला सुरवात झाली. त्यानंतर वामनदादा कर्डक यांच्या गीतांसह ‘दोनच राजे’ हे गाजलेले गीत शरद शेजवळ यांनी सादर केले. समृद्धी गांगुर्डे यांनीही आपल्या आवाजातून कार्यक्रमाची रंगत वाढविली. या कलावंतांसोबत सहगायक गौतम हिरे, ज्ञानजगत कांबळे यांनीही सहभाग नोंदविला. गायकांना कृष्णा कसबे (तबला), योगेश मोरे (ढोलक), राहुल लेणार (हार्मोनियम) यांनी साथ दिली.

कथक नृत्यातून देशभक्‍तीचा जागर
मुंबईत झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्याच्या स्मृतिदिनी आज कीर्ती कलामंदिराच्या कलावंतांनी कथक नृत्यातून देशभक्‍तीचा जागर केला. रेखा नाडगौडा यांच्या शिष्यांनी ‘जयोऽस्तुते’ गीतावर कथक नृत्य सादर केले. मैथिली कुलकर्णी व क्षितिजा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वा गायधनी, तनया भांड, नुपूर जुन्नरे, ऋचा गायधनी, चैताली थेटे, अपर्णा कुलकर्णी, खुशी पाटील यांनी तालबद्ध असे कथक नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com