ट्रकचालक, क्‍लीनरची लूटमार करणाऱ्या तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

नाशिक - नाशिक-पुणे महामार्गावरील गुरुद्वाराजवळ ट्रकला अडवून लूटमार करणाऱ्या तिघांना उपनगर पोलिसांनी अटक केली. उत्कर्ष मुरकुटे (वय 21, रा. विहितगाव), सूरज राठोड (रा. म्हसरूळ), शाहबाज शेख (वय 20, रा. विहितगाव) अशी संशयितांची नावे असून, उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

गुरुद्वाराजवळ एका ट्रकला अडवून तीन जण मारहाण करीत असल्याचा बिनतारी संदेश पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून उपनगर पोलिसांच्या गस्ती पथकाला आज पहाटे मिळाला. त्यानुसार, गस्ती पथकातील उपनिरीक्षक साहेबराव पवार व सहकारी तत्काळ घटनास्थळी पोचले असता, कारमधून (एमएच 15, ईपी 4638) आलेल्या तिघे संशयित उत्कर्ष मुरकुटे, सूरज राठोड, शाहबाज शेख यांना अटक केली. तिघा संशयितांनी ट्रकचा (जीजे 15, एक्‍सएक्‍स 7865) चालक व क्‍लीनरला मारहाण करून मोबाईल, पैशांचे पाकीट असे दहा लाख आठ हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. संशयितानी गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे. याप्रकरणी क्‍लीनर जितेंद्रकुमार रामकेवल याच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई उपनिरीक्षक साहेबराव पवार, हवालदार राजोळे, बोडके, जाधव, गवांदे, शिंदे चंद्रमोरे, सोनवणे, परदेशी यांच्या पथकाने केली. 

संशयित बीडीओचा मुलगा 
संशयित उत्कर्ष मुरकुटे सराईत गुन्हेगार असून, संशयितांकडून शहरातील लूटमारीतील गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे. तसेच, मुरकुटे त्र्यंबकेश्‍वरचे बीडीओ मधुकर मुरकुटे यांचा मुलगा आहे.

Web Title: nashik news crime