प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नगरसेवक सय्यद निर्दोष 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

नाशिक - सारडा सर्कल येथे जुन्या वादातून झालेल्या हाणामारीमध्ये विद्यमान अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांच्यासह सहा जणांची प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यातून निर्दोष सुटका करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. सुचित्रा घोडके यांनी या प्रकरणात न्यायालयात खोटी साक्ष व पुरावे दिल्याप्रकरणी समृद्धी हॉस्पिटलचे डॉ. संतोष घेगडमल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश दिले आहेत. 

जुन्या वादाची कुरापत काढून सारडा सर्कल येथे 8 जुलै 2014 मध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास सय्यद जाकीर सय्यद हुसेन व त्यांचा मुलगा हुसेन या दोघांवर प्राणघातक हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी विद्यमान नगरसेवक मुशीर सय्यद, सगीर सय्यद, समीर सय्यद, तौकीर सय्यद, मुनीरोद्दीन सय्यद, कामरान अन्सार (सर्व रा. सारडा सर्कल) यांना आरोपी करण्यात आले होते. यासंदर्भात जिल्हा व सत्र न्यायधीश श्रीमती सुचित्रा घोडके यांच्यासमोर खटला चालून सरकारी पक्षातर्फे 14 साक्षीदार तपासण्यात आले होते. परंतु संशयितांविरोधात सबळ पुरावा मिळू न शकल्याने मुशीर सय्यद यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खटल्यादरम्यान समृद्धी हॉस्पिटलचे डॉ. संतोष अशोक घेगडमल यांनी न्यायालयात खोटी साक्ष दिली. तसेच खोटे पुरावे सादर केले. संबंधित बाब लक्षात आल्यानंतर डॉ. घेगडमल यांनी न्यायालयाकडे लेखी क्षमायाचनाही केली. त्यामुळे डॉ. घेगडमल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले. निकाल जाहीर झाल्यानंतर सारडा सर्कल परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जादा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. 

Web Title: nashik news crime corporator