मानवी तस्करीच्या गुन्ह्यात नाशिकमध्ये दलाल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

मानवी तस्करीचे गुन्हे  
 पश्‍चिम बंगाल    ३,५७६
 राजस्थान    १,४२२
 गुजरात    ५७६
 महाराष्ट्र    ५१७
 तमिळनाडू    ४३४
 कर्नाटक    ४०४

नाशिक - बांगलादेशी युवतीची विक्री करून तिला वाममार्गाला लावण्याच्या प्रकरणात दलाली करणाऱ्या दोघांना आज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक वर्षांपासून मुसळगावला चालणाऱ्या या अड्ड्यावरून आणखी किती युवतींचे व्यवहार झाले हे शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी दलालांवर धाडी टाकायला सुरवात केली आहे.

बहिणीच्या मुलीला विकणारी पीडित युवतीची मावशी माजिदा शेख अद्यापही फरारीच आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुसळगावला वर्षानुवर्षांपासून वेश्‍याव्यवसायाचा अड्डा चालविणाऱ्या नानी ऊर्फ मंगल नंदकिशोर गंगावणे व तिचा मुलगा विशाल गंगावणे, दलाल सोनू देशमुख या तिघांना बुधवारी अटक केली. त्यांच्यासह सात जणांवर पिटा, बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. ग्रामीण पोलिसांनी आज पुन्हा धाडसत्र राबवीत भद्रकालीत दोघांना अटक केली.

दोघे ताब्यात; २० पर्यंत कोठडी
या प्रकरणी आसिफ फारूक शेख (वय २६, रा. चौकमंडई) व सिद्धार्थ गौतम सोनकांबळे (२१, रा. भीमवाडी, गंजमाळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक करून तपासासाठी न्यायालयापुढे हजर केले असताना संबंधितांना येत्या २० तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून चालत असलेल्या पण सिन्नर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे राज्यात बदनाम असलेल्या मुसळगाव येथील कुंटणखान्यात बांगलादेशी युवतीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचे पुढे आले. दुर्दैव म्हणजे संबंधित युवतीनेच या प्रकरणी पर्दाफाश केल्यानंतर पोलिस यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या प्रयत्नात ग्रामीण पोलिसांनी सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची तयारी चालविली आहे. मानवी तस्करीच्या घटना महाराष्ट्रात घडत असल्या तरी नाशिक जिल्ह्यात मात्र अशा घटनांची वदंता नाही. मात्र सिन्नरच्या मुसळगाव येथील कुंटणखान्यातील व्यवहाराच्या प्रकरणाच्या निमित्ताने नाशिकही या घटनांना अपवाद नसल्याचे पुढे  येते आहे. 

Web Title: nashik news crime human trafficking